सोनाळे कोदेपाडापूलाचा लोकार्पण सोहळा संपन्न! :कालव्यावरच्या लाकडी ओंडक्यावरचा आदिवासींचा जीवघेणा प्रवास थांबला
बोईसर-(संतोष घरत) दि. २१ एप्रिल
डहाणू मधील कासा नजीकच्या विवळवेढे येथे महालक्ष्मी यात्रा सुरू असताना, नजीकच्या सोनाळे कोदेपाडा येथे खऱ्याअर्थाने देवी नवसाला पावल्याची भावना आदिवासींनी व्यक्त केली. सुर्या धरणावरील उजव्या कालव्यामुळे कोदेपाड्याचे भौगिलीक दोन भाग पडल्याने, स्थानिकांना लाकडाचे ओंडके रचून जीवघेणा प्रवास करावा लागायचा. शिवसेनेचे पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संख्ये यांनी हा प्रकार पाहून लोखंडी पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. गुरुवार, २१ एप्रिल रोजी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व विधान परिषद आमदार मा.श्री .रवींद्र फाटक यांच्या अध्यक्षतेखाली या पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
विवळवेढे(महालक्ष्मी) ग्रामपंचायती अंतर्गत सोनाळे, कोदेपाडा या आदिवासी पाड्याची लोकसंख्या सुमारे पाचशे आहे. या गावातून सुर्या धरणातून निघणारा प्रमुख उजवा कालवा जातो. त्यामुळे कोदेपाड्याचे दोन भागात विभागणी झाली. पाणी भरणे, गुरांना चरायला घेऊन जाणे, विद्यार्थ्यांना शाळेत आणि शेतकऱ्यांना शिवारात इ. करिता या आदिवासीपाड्याचा गावगाडा चालविण्यासाठी लाकडाच्या पुलावरून मार्गक्रमण करावे लागत होते. सत्तर वर्षांपूर्वीपासून हा जीवघेणा प्रवास सुरु असल्याचे माजी उपसरपंच जयप्रकाश कोदे म्हणाले. काही दिवसांपूर्वी एका नागरिकाचा प्रवाही पाण्यात बुडवून मृत्यू झाला असून छोटे-मोठे असंख्य अपघात घडले आहेत.
दरम्यान यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात येथील प्रश्न स्थानिक कार्यकर्यांच्या माध्यमातून वैभव संखे यांना समजला. त्यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांना लवकरच कालव्यावर लोखंडी पुल बसविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार संखे यांनी आश्वासन पाळत गुरुवारी खासदार श्री. राजेंद्र गावित, आमदार श्री .श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ.वैदेही वाढाण, माजी आमदार श्री.अमित घोडा, जिल्हाप्रमुख श्री.राजेश शहा ,जिल्हाप्रमुख श्री.वसंत चव्हाण ,महिला संपर्क प्रमुख सौ.ममता चेंबूरकर ,महिला संघटक सौ.ज्योती मेहेर ,तालुका संघटक सौ. नीलम म्हात्रे, विधानसभा संघटक श्री. निलम संखे, तालुकाप्रमुख श्री.विकास मोरे ,तालुकाप्रमुख श्री.अशोक भोईर , जिल्हा परिषद गटनेते श्री.जयेंद्र दुबळा , श्री.कुंदन संखे श्री.सचिन पाटील , श्री.हेमंत संखे श्री.संजय तामोरे ,माजी सभापती सौ.मनीषा पिंपळे ,सौ.नमिता राऊत ,पंचायत समिती सदस्य सौ.भारती सावे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. अनेक दशकांची मागणी पूर्ण झाल्याने सकाळपासून स्थानिकांनी तारपा व संबळ(नाईकी लतूर) इ. वाद्य वाजवून आनंद साजरा केला जात होता. मान्यवरांचे आगमन होताच महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन पारंपरिक नृत्य सादर करून कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी हा दुर्गम आदिवासीपाडा दणाणून गेला होता. तर आपल्या भावना व्यक्त करताना संखे भावूक झाले होते.
" शिवसैनिक माध्यमातून येथील समस्या कळली, त्यानंतर घटनास्थळी भेट देऊन लोखंडी पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. युवानेते आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने स्थानिकांची समस्या सोडवली. यापुढेही सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत राहणार आहे."
वैभव संखे(शिवसेनेचे पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख )
Post Views: 375