अकोला, दि. २३ : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच आंतररष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करता यावी यासाठी खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास भोजन, तसेच देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण, प्रशिक्षण उपकरणे, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात / खरेदी करणे गणवेश या बाबीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील पात्र खेळाडुंकडून आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, या योजनेसाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, एशियन कप, राष्ट्रकुल स्पर्धा, एशियन कप, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, वर्ल्ड कप, शालेय आशियाई / जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळ/ क्रीडा प्रकाराचा समावेश असेल तेच खेळ / क्रीडा प्रकार वरील नमुद इतर स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय असतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत खेळाडू महाराष्ट्र राज्याचा १५ वर्षाचा रहिवासी असावा, खेळाडूने गत तीन वर्षात कनिष्ठ / वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करून किमान एकदा पदक मिळविले असणे आवश्यक आहे. भारतीय खेळ महासंघ अथवा अधिकृत भारतीय खेळ संघटना यांच्यावतीने अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी निवड झाल्याबाबत प्रमाणपत्र संबंधीत खेळाडूकडे असावे. निमंत्रित स्वरूपाच्या स्पर्धासाठी झालेली निवड पात्र ठरणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रताधारक खेळाडूने अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधून विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन मंगळवार दि.३० नोव्हेंबर पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.