मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता आहे. राज यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्राद्वारे केली होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या पत्राकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे राज यांना आता थेट केंद्र सरकारकडून सुरक्षा दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
राज ठाकरे यांना पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी यात कपात करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. मात्र, राज यांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा अहवाल गुप्तचर खात्याने दिला होता. या अहवालाकडे दुर्लक्ष करत सरकारने उलट सुरक्षेत कपात केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने पीएफआय या संघटनेने त्यांना धमकी दिली होती. अन्य काही धार्मिक संघटनांनीही राज यांच्या भूमिकेला विरोध करत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षा देण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना रानौत, भाजप नेते किरीट सोमय्या, खा. नवनीत राणा यांना सुरक्षा दिली होती. विशेषत: महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांना केंद्राने स्वत:चे सुरक्षाकवच बहाल केले आहे. सध्या राज ठाकरे यांनी मविआ सरकारविरोधात सूर आळवले आहेत. त्यातच मशिदींवरील भोंग्यांना ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा मशिदींच्या बाहेर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे हे लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना ही सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे समजते.
अमित शहांना पत्र लिहिणार -
- राज ठाकरे यांना काही संघटनांकडून धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती.
- त्यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे.
- राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांनादेखील सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केली जाईल.
- तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही याबाबत पत्र देणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
Post Views: 227
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay