महिलांनी सावित्रीबाई फुलेंसारखे समाजहिताचे कार्य करावे – डॉ. श्रीकांत तिडके


स्पंदन काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Jan 2026, 9:02 AM
   

अकोला : सौ. वंदना सतिश तिडके यांच्या लेखणीतून साकारलेल्या स्पंदन या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी अकोला येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके होते.
प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य पुष्पराज गावंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकांत तिडके यांनी महिलांनी सावित्रीबाई फुलेंसारखे विधायक व समाजहिताचे कार्य करावे, असे मत ठामपणे मांडले. समाज परिवर्तनात स्त्रियांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी कवयित्री वंदना सतिश तिडके यांनी महिलांचे सक्षमीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तर हेमंत बेंडे यांनी निसर्गाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्याची गरज असल्याचे सांगितले. ज्येष्ठ कवी व कथालेखक सुरेश पाचकवडे यांनी काव्यसंग्रहातील कवितांचे थोडक्यात विवेचन केले.
मुक्ता पब्लिकेशनचे सागर लोडम यांनी जिथे स्त्रीमन बोलते, तिथे शब्दांना संवेदनांचे पंख लाभतात, असे भावपूर्ण प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला वसंतराव तिडके, बाबासाहेब बुटे, तसेच श्रीमती मानसी मानकर (माजी मुख्याध्यापिका, हिंदू ज्ञानपीठ मराठी माध्यमिक शाळा, अकोला) व डॉ. ज्योत्स्ना कानकिरड (माजी मुख्याध्यापिका, हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, अकोला) यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन गझलकार प्रा. मोहन काळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश शंकरराव तिडके, अनुराग सतिश तिडके, वसंतराव काळे, विवेक राऊत, निखील महल्ले, ऋषिकेश पटोकार, शशांक भेले, अक्षय पवार, निखिल देशमुख, पवन पंचवटे, अभिलाष गोटे, स्वप्नील बाविस्कर, अक्षय गावंडे  यांनी परिश्रम घेतले. अकोला व मुर्तिजापूर येथील प्राध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

    Post Views:  6


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व