तिथीनुसार शिवजयंती म्हणजे मतांची दुकानदारी


आमदार अमोल मिटकरींचा मनसेला टोला
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Mar 2022, 7:46 PM
   

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त मनसे, शिवसेनेकडून राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही मराठी माणसांसाठी सण आहे. हा सण तिथीनुसार साजरा करायला हवा असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 21 मार्चची शिवजयंती जल्लोषात साजरी करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. आज मनसेकडून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अश्वारुढ शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पवृष्टी करण्यात आली. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेला टोला लगावला आहे.
शिवजयंती ही 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हायला हवी. रोज साजरी झाली तरी हरकत नाही. परंतु आज जी जयंती साजरी करतोय ती मतांसाठी केली जातेय. मला माझे मत मागण्याचा अधिकार आहे. शिवजयंती साजरी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुमचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करता का? मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा करता का? छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदूंचे होते का? ते सर्वांचे होते. 19 फेब्रुवारीला महात्मा फुले यांनी साजरी शिवजयंती साजरी केली. 19 फेब्रुवारीच शिवजयंती असावी हे शासनमान्य झाले आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सर्व महापुरुषांची जयंती तारखेनुसार साजरी होते. मग फक्त शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद का? शिवजयंती संपलेली आहे. 19 फेब्रुवारीला ती साजरी करण्यात आली आहे. आज जी जयंती साजरी होतेय त्यातून मतांची दुकानदारी करायची हे आयोजकांचे उद्दिष्ट आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा अट्टाहास कालबाह्य झाला आहे. आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी शिवजयंतीचे नवीन वाद पुढे आणला आहे, असा आरोप मिटकरींनी मनसेवर केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मराठी माणसांसाठी सण आहे. उगाच राजकारण करू नका. फालतू वाद घालू नका. हिंदूंचे सण तिथीनुसार साजरी होतात. कुठल्या गोष्टीवर राजकारण करता याची लाज वाटली पाहिजे, असे उत्तर मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिले आहे. 
शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच...
ज्यांना राजमुद्रा पाठ नाही ते आम्हाला शिकवतात. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणा? आमची अक्कल काढू नका. छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे यांनीही 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्रासह देशभरात 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी झाली. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचे हे धंदे महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे असे सांगत आमदार अमोल मिटकरींनी मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्यावर निशाणा साधला.

    Post Views:  243


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व