मुंबई : शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल, असे म्हणत खोचक टोला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खातेवाटपावरून निशाणा साधला आहे. फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल आले, असे पटोले यांनी म्हटले आहे. भाजपा सत्तेचा अमरपट्टा घातल्याप्रमाणे वावरत आहे, परंतु याची आंबट फळेच त्यांच्या वाट्याला येतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायप्रक्रियेस होणारा विलंब ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, असे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप रविवारी जाहीर केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 पेक्षा अधिक खात्यांचा कार्यभार असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह सात खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. महिला व बाल कल्याण विभागाचा कार्यभार आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असणार आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याचा कार्यभार असेल. यानंतर खातेवाटपावरून काँग्रेसने शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Post Views: 151