अनाथांची माय, विदर्भाची बहिणाबाई,आणि मेळघाटातील आदिवासींची वाघिण हरविली !


 संजय देशमुख  06 Jan 2022, 7:47 PM
   

रात्रीच्या अंधाराला घाबरू नका , सकाळच्या उजेडाची पायवाट तुमच्या जीवनाला उजळून टाकणार आहे , अशा सकारात्मक उर्जेच्या संदेशातून राष्ट्राच्या आधारस्तंभांना सर्वांगीण शक्तीनीशी उभं राहण्याचा जादुई मंत्र देणार्‍या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची प्राणज्योत आजारपण आणि झालेल्या शस्त्रक्रियेनंतर काल पुण्यात मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशातील संवेदनशील मने हेलावली अन् या दुःखाची धग सातासमुद्रापारही जाऊन पोहचली. एवढे मोठे गगणस्पर्शी कार्य या मायमाऊलीने महाराष्ट्रात उभे केले आहे. स्वतः साधना करीत इतरांना कार्यप्रवण करण्याचं बळ देत एक खरं खुरं वास्तव जीवन आणि सामाजिक जाणीव देण्याचं काम जीवनाच्या अखेरपर्यंत केलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून विश्व निर्माण करणार्‍या, प्रसंगी कोणालाही न घाबरणार्‍या या मेळघाटच्या वाघिणीने, विदर्भाच्या बहिणाबाई आणि वात्सल्यपूर्ण भावनांनी-अनाथांची माय ठरलेल्या कर्तृत्ववान माईने अखेर नियतीसमोर शरणागती पत्करून या महाराष्ट्राचा अखेरचा निरोप घेतला.  एकूण ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी ही असामान्य कर्तृत्वाची अल्पशिक्षीत सामान्य महिला होती. आमच्या पत्रकारितेच्या शुभारंभात त्यावेळी साप्ता.वृत्तसंजीवनी प्रकाशनाला त्यांनी अलंकारीक शब्दांमध्ये लिहून दिलेला शुभेच्छा संदेश कायम स्मरणात आहे!
वर्धा जिल्ह्यात जन्माला आलेल्या सिंधुताईंनी भिकारी, आदिवासी, अनाथ मुले आणि तळागळातील घटकांसोबत राहून मानवी जीवनाचा सखोल अभ्यास केला होता.  तेच अनुभव प्रायोगिक ठरवून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात केली. लहान वयात मोठ्या वयाच्या पुरूषाशी लग्न, घरातील दारिद्र्य, शिक्षणाला विरोध, होणारी हेळसांड, अपमानजनक वागणूक आणि शेवटी घरातून हाकलल्या जाण्याची परिस्थिती, हे सर्व सहन करीत ही माऊली कधी प्रतिकूल प्रसंगांनी खचली नाही. नवं बळ निर्माण करीत तिने प्रथम अन्यायग्रस्त अगतिक आदिवासींची सेवा केली. त्यासोबतच अनाथ बालकांचे संगोपण करून त्यांच्या उत्थापनाचे कार्य हाती घेतले. त्यामुळे एकाच पूत्राचे मातृत्व स्विकारून माता होण्यापेक्षा ती हजारो अनाथांची माय ठरली! महाराष्ट्रातील एका अनोख्या आदर्शवादी मातृत्वाच्या कर्तव्याचे ते चालते बोलते विद्यापीठ ठरले!
 चिखलदरा येथे मेळघाटातील आदिवासींना संघटीत करून त्यांनी त्यांच्यावरील अन्यायाच्या प्रतिकाराकरीता विंध्य-सातपुडा संघर्ष समितीची स्थापना केली. त्या काळात थेट वनाधिकार्‍यांशी भिडणारा हा धगधगता निखारा म्हणजे मेळघाटातील आदिवासींची वाघिण होती. या वाघिणीच्या वर्धा, मेळघाट आणि त्यानंतर पुणे केंद्रातून पुढे देशभरात आणि सातासमुद्रापार व्यापलेल्या कर्मकहाणीचा काल पुण्यातून अकस्मात अंत झाला. एक धगधगता निखारा आणि सोबतच वात्सल्याने परिपूर्ण असलेली माय, सामाजिक प्रबोधन करणारी जेष्ठ समाजसेविका, आणि अल्पशिक्षीत असूनही प्रतिभेचं देणं लाभलेल्या लेखिका - कवयित्रीच्या कर्मकहाणीचा अंत शेवटी पुण्यातूनच झाला! 
विदर्भात मेळघाटातील चिखलदर्‍यातून त्यांच्या कामाची सुरूवात झालेली होती. त्या काळात भ्रष्ट वनाधिकारी निरक्षर आदिवासींची पिळवणूक करून त्यांच्या जनावरांना चार्‍याकरीता मनाई करीत होते. त्यासोबतच त्यांच्या शेणावर आणि दुधदुभत्यांवरही अधिकार सांगून भ्रष्ट मार्गाने त्यांची पिळवणूक करून अन्याय करीत होते. त्यांच्यावरील अन्यायाचे निवारण आणि त्यांना त्यांच्या अस्मितेची जाणीव देऊन धिरोदात्तपणे उभं करण्याचं काम पुण्यात स्थिर होण्यापूर्वी सिंधुताईंनी केलेले आहे. तिथेच त्या मेळघाटच्या वाघिण ठरलेल्या होत्या. आदिवासींना संघटीत करण्याकरीता त्यांचे आराध्य दैवत श्रीकृष्ण मंदिराची उभारणी त्यांनी तिथे केली होती. 
अनाथ बालकांचे संगोपन, सामाजिक प्रबोधन आणि या कार्यातून समाजजीवनाला नवसंजीवनी पुरविणारे आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांना मेळघाटचा मुक्काम हलवून बाहेर पडणे आवश्यक होते. तिथेही राहून त्या महाराष्ट्रभर भ्रमण करीत होत्याच. परंतू पुढे त्या अनेक समाजसेवक, लोकप्रतिनिधी आणि संवेदनशील लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना त्यांच्या कार्याच्या संकल्पना पटवून देण्याचे प्रयत्न करीत राहिल्या, आणि हळू हळू पुण्यात स्थायिक झाल्या. तेथूनच त्यांच्या कार्याला गगणस्पर्शी स्वरुप प्राप्त होऊन देशा परदेशातील व्यासपीठावर त्यांना निमंत्रणे येऊ लागली. उभारलेल्या संस्थाचा पसारा वाढला, आर्थिक बळ मिळत गेल्याने कार्याची व्यापकता सिद्ध होऊ लागली. जीवनातील सुरवातीच्या हाल, अपेष्टा आणि अवहेलनाजण्य प्रसंगात त्यांची चांगलीच परवड झाली. काही वेळा त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलण्याचाही प्रयत्न केला. परंतू या माय माऊलीला असे निराश, हताश होत मरू देणे नियतीला मान्य नव्हते. कारण हजारो अनाथांची ती माय ठरणार होती. म्हणून तिला जगविण्यासाठी नियती बळ देत आली. तिला पुढे पुढे दिशा दाखवून व्यापक कार्याचे मार्ग प्रशस्त करीत गेली. तिचे हे कार्य आणि वात्सल्य भावना, अनुभवल्यानंतर आज या अनाथांच्या माऊलीच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र आणि देशही शोकमग्न झाला. 
सुष्ट्रीचक्रामध्ये मानवतावादी कार्यासाठी अनेक जीव जन्माला येतात. त्यातील अनेक त्यांच्यातील गुण आणि कर्तृत्वामुळे नावारुपाला येऊन थोर ठरतात. अशा व्यक्ती उपजतच सर्वगुणसंपन्न असल्याने त्यांना शिक्षण, कुटूंब, पैसा यांच्या सिमारेषांची बंधने कधी अडकवून ठेऊ शकत नाहीत. पुढे तेच समाजाचे आदर्श ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे स्व. सिंधुताई सपकाळ! आतापर्यंत ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी रणरागिणी! महाराष्ट्रातील विदर्भात जन्माला आली आणि आपल्या अफाट कार्याच्या पाऊलखुणा मागे ठेवत सर्वांचा निरोप घेऊन ही जीवनज्योत कायमची निमाली.
 सिंधुताईंना नुकताच पद्मश्री पुरस्कार आणि यापूर्वी शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, मुर्तिमंत आईसाठीचा आंतरराष्ट्रीय, आय टी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा  दत्तक माता पुरस्कार, शिवलीला महिला गौरव, लोकसत्ताचा सह्यांद्री हिरकणी, पुणे विद्यापीठाचचा जीवनगौरव हे  मिळालेले ७५० मधील निवडक पुरस्कार आहेत. त्या जगासाठी जागृतीच्या पणती होत्या. नशीबी अवहेलना आल्यावरही खचून न जाता कार्य करीत राहिल्या. त्या असामान्य कर्तृत्वानेच त्या प्रथम मेळघाटची वाघिण, अनाथांची माय विदर्भाची बहिणाबाई ठरत पश्चिम महाराष्ट्रातून नावारूपास आल्या होत्या, अशा या कर्तृत्वसंपन्न झंझावाताला सलाम! भावपूर्ण आदरांजली!
संजय एम.देशमुख 
मोबा.९८८१३०४५४६

    Post Views:  322


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व