प्रेक्षणीय स्थळ... रमणीय वास्तू...प्रभूसृष्टी
महाराष्ट्रातील कोकण हे एक मुख्य पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. भौगोलिक व सांस्कृतिक वास्तूंची देखभाल केलेलं, ज्याच्या सौंदर्याची भुरळ मनामनाला पडून, आवड निर्माण करणारं, हिरव्या गर्द निसर्ग संपदेनं नटलेलं ठिकाण म्हणजे कोकण. समुद्र किनारपट्टीवरील नारळी, सुपारीच्या बागा तसंच आंबा, काजू, कोकम, फणस इत्यादी रानमेव्यांची झाडं. शिवाय कौलारू घरं व शेती, मंदिरं, सागर, खाडी, किल्ल्यांनी नटलेला आसपासचा परिसर हे सर्व न्याहाळताना आपलं मन मंत्रमुग्ध झालं नाही तर नवलच!!
याच कोकणातील एक सुंदर रमणीय ठिकाण म्हणजे कुडाळ तालुक्यातील वालावल आणि याच वालावल नेरूर गावात प्रभूसृष्टी निखळ सौंदर्यानं नटलेलं पर्यटन स्थळ जे वसवलं आहे श्री पुरुषोत्तम दामोदर प्रभू या सद्गृहस्थांनी. काही दिवसांपूर्वी या रमणीय स्थळावर जाण्याचा योग आला तेव्हा इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचं हसतमुखानं स्वागत करून त्यांचं होणारं आदरातिथ्य पाहून मन अगदी भारावून गेलं. सकाळच्या उत्तमोत्तम न्याहारीचे पदार्थ आपल्याला इथे चाखायला मिळतात, त्यात माझ्या कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीची न्याहारी होती घावण-चटणी व नारळ-गुळ मिश्रीत मधुर रस आणि तो रस पिऊन मन अगदी तृप्त तृप्त झालं. तसंच दुपारचं जेवण, संध्याकाळी गरम पेय व रात्रीच्या चविष्ट सात्विक पोटभर भोजणाचा मनमुराद आनंद घेता आला.
सर्व सुख सुविधांनी युक्त असं प्रभुसृष्टी रिसोर्ट व इथला आतील सुंदर परिसर न्याहाळताना मनात एकच येत होतं ते म्हणजे खरोखर ही साक्षात प्रभूनेच निर्माण केलेली सृष्टी आहे. इथलं सौंदर्य शब्दांत मांडणं तसं कठीणच पण प्रत्यक्ष जाऊन तिथल्या आदरातिथ्याचा अनुभव प्रत्येकानं घ्यावा अशी ही श्री. प्रभू साहेबांनी निर्माण केलेली सृष्टी आहे. अर्थात त्यांचा हा कारभार सांभाळण्यासाठी अनेक स्थानिक ग्रामीण सहकारी त्यांच्या सोबत आहेत. तसंच तिथली संपूर्ण व्यवस्था अगदी चोख हसतमुखानं सांभाळणारे श्री. सामंत साहेब गेली अनेक वर्षे इथला कार्यभार सांभाळत आहेत व स्वतः जातीन प्रभूसृष्टीचे सर्वेसर्वा श्री प्रभू साहेब पर्यटकांच्या स्वागताला हजर असतात. एवढंच नव्हे तर त्यांनी आतील संपूर्ण परिसराची आम्हाला माहीती करून दिली. दुसरं आपल्याला जे खावेसे वाटतील ते पदार्थ झटपट पण तितक्यात मायेनं व प्रेमानं करून वाढणारे इथल्या कुशल सोबत्यांचे हात दिवसभर राबत असतात व तितक्याच अगत्यानं ते येणाऱ्या पर्यटकांना खाऊ घालतात.
येथील खास आकर्षण म्हणजे लाल चि-यांनी बांधलेले टुमदार बंगले, हाकेच्या अंतरावर असलेलं भोजनालय व तिथे बसून हिरव्या गर्द झाडांना पाहत मस्त मालवणी पद्धतीच्या जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेणं हा आमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.
इथे बारा एकर जमिनीवर विविध वृक्ष लागवड केलेली असून त्यांची नित्य नेमानं देखभाल केली जाते. त्यामुळेच तर इथल्या हिरव्या गर्द निसर्ग संपदेला पाहून भान हरपतं. इथे काही प्रमाणात भात शेती केली जात असून भाज्या, पालेभाज्या व मका पिकाची लागवड सुद्धा केली आहे. तिथून जवळच असलेला गाई व म्हशींचा गोठा, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तसंच असंख्य माडांची, आंब्याच्या विविध कलमांची झाडं, काजू, केळी व सुपारीच्या बागा, शिवाय रामफळ, सिताफळ, रातांबे, जाम, चिकू अश्या फळांची झाडं आहेतच आणि जोडीला जायफळ, दालचिनी, लवंग, मिरी अशा मसाल्याच्या पदार्थांची झाडंही इथे जोपासली आहेत व सर्वात विशेष म्हणजे दुर्मिळ असं हिंगाचं झाडसुद्धा इथे आहे बरं!!
या रमणीय वास्तूत प्रवेश करताना हिरवाईनं नटलेला आजूबाजूचा परिसर व प्रभूसृष्टीचं प्रचंड मोठं प्रवेशव्दार जिथून आत प्रवेश करताच क्षणी आम्हाला आंब्याच्या मोहोराच्या सुगंधानं मंत्रमुग्ध केलं. शिवाय इथून जवळच असलेली अतिशय सुंदर कर्ली नदी व त्यातील नौका विहार, पुरातन काळातील लक्ष्मीनारायण मंदिर हे खास आकर्षण आहे इथलं. हे सर्व पाहताना, अनुभवताना मन प्रसन्न होतं, खरोखर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण पर्यटकांनी एकदा पाहिलं की पुन्हा पुन्हा नक्की भेट देत राहतील, एवढं मात्र नक्की!!
स्मिता दळवी
खारघर, नवी मुंबई
९८३३८६४८८४
Post Views: 282