चिंतनशील लेखन करून समाजाला पुढे नेणे गरजेचे - पद्मश्री ना. चं. कांबळे
लता बहाकर लिखित बळीराणी कादंबरीचे प्रकाशन
अकोट: कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगण्याची किमया लेखकाला साधता आली पाहिजे यासाठी नवलेकांनी अभ्यासपूर्वक लिखाण करण्यासाठी चिंतन केले पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री ना. चं. कांबळे यांनी केले.
बळीराणी कादंबरीचे प्रकाशन करताना पद्मश्री ना.चं. कांबळे, समवेत किरण अग्रवाल, उमेश अलोने, गजानन दांदळे, गजानन सावरकर, विनय मिरासे, पुष्पराज गावंडे, अनघा सोनखासकर, अनिल बहाकर, लेखिका लता बहाकर
दांदळे कोचिंग क्लासेसच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात लता बहाकर लिखित बळीराणी कादंबरीचे प्रकाशन पद्मश्री कांबळे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी साहित्यात स्त्रीवादी लिखाण आता व्हायला लागले आहे. समाज माध्यमांवर व्यक्त होण्यापेक्षा, व्यक्त होऊन झटपट प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा गंभीर व चिंतनशील लेखन करून समाजाला पुढे नेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल होते. पद्मश्रीने गौरव झाल्याबद्दल कांबळे यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कारही करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, यवतमाळचे जेष्ठ साहित्यिक विनय मिरासे, लेखिका प्रा. डॉ. अनघा सोनखासकर, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन सावरकर, युवा लेखक उमेश अलोने, दांदळे क्लासेसचे संचालक प्रा. गजानन दांदळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी अनिल बहाकर यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. लेखिका बहाकर यांनी कादंबरी लेखनामागील प्रेरणा विशद केली.
बळीराणी कादंबरी साहित्य लेखन हे समाज संवादाचे प्रभावी माध्यम असून, बळीराणी कादंबरीने वऱ्हाडी बोलीची श्रीमंती व समृद्धी वाढविली आहे बोलीभाषेच्या जतनासोबतच बळीराणी वऱ्हाडी साहित्यातील महाराणी म्हणून स्थान निर्माण करेल, असा विश्वास कादंबरीकार पुष्पराज गावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
बळीराजाच्या दुःख-दैन्याची चर्चा साहित्यात दिसते, मात्र त्याचा कणा असलेल्या त्याच्या सहचरणीची फारशी दखल घेतली गेलेली दिसत नाही. पुरुषप्रधानतेतून ओढवलेले हे दुर्लक्ष आहे. कृषी संस्कृतीत आपल्या कष्टाने, घामाने, धीराने बळीराजाची पाठराखण करणारी राणी बळीराणीमधून मांडली गेली आहे, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी केले.
बळीराणी कादंबरी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी असल्याचे मत मिरासे यांनी व्यक्त केले. स्त्रीवादी कादंबरी सातासमुद्रापार जावो, अशी अपेक्षा सोनखासकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला गझलकार नीलेश कवडे, वाशिमचे नंदकिशोर नारे, राजू चिमणकर, तुळशीदास खिरोडकार, सागर लोडम उपस्थित होते. सूत्रसंचालन दिगंबर खडसे तर आभार विनोद तळोकार यांनी मानले.
Post Views: 249