धागा धागा अखंड विणू या...! कापूस ते कापड प्रक्रियेचे चक्र गतिमान


मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; जिल्ह्यात २७ लघु उद्योग एकक कार्यान्वित
 संजय देशमुख  02 Feb 2022, 8:18 PM
   

अकोला : एकाच व्यवसायाशी निगडीत उद्योग करणाऱ्या लहान लहान उद्योग एककांना एकत्र आणून कापूस ते कापड या प्रक्रियेचे चक्र जिल्ह्यात गतिमान झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या २७ उद्योग एककांचे एकत्रिकरण दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला या नावाने तयार करण्यात आले असून त्यांचे प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले आहे. नुकतेच बंगलोर येथील एजन्सी मार्फत मॅक्स या इंटरनॅशनल ब्रॅंडचे दोन लाख टी शर्टस बनविण्याची ऑर्डर या उद्योगास मिळाली आहे. उद्योगाचे धागे अखंड विणत, आर्थिक समृद्धीची वस्त्र- प्रावरणे दृष्टीपथात आहेत.

कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या अकोला जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया उद्योग होऊन कापूस ते कापड येथेच तयार व्हावे, अशी ही संकल्पना. या संकल्पनेला जिल्ह्यात एक गाव एक उत्पादन, हे रुप देऊन पालकमंत्री बच्चू कडू यांनी चालना दिली. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत  कापूस प्रक्रिया करणाऱ्या एककांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला या उद्योग समुहाचे एकत्रिकरण करण्यात आले. आता सद्यस्थितीत शेलापूर व बोरगाव मंजू येथील युनिट्स मिळून २७ युनिट कार्यरत आहेत. सुक्ष्म व लघु उद्योग एकक विकास कार्यक्रमात  हे क्लस्टर विकसित करण्यात आले. प्रत्येकी ५० लक्ष रुपये भांडवलातून ही युनिट्स उभी राहिली आहेत.

२७ जणांचा सहभाग

या उपक्रमाची सुरुवात सम्यक जिनिंग चिखलगाव येथून झाली. या उद्योगाचे चालक कश्यप जगताप यांनी माहिती दिली, की, कापसाचे केवळ जिनिंग प्रेसिंग न करता पुढे धागे व कापड ते थेट वस्त्र तयार करे पर्यंत  प्रक्रिया येथेच कराव्यात. यासाठी विविध उद्योजकांना एकत्र केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी त्यास चालना देऊन एकूण ३० जणांना  एकत्र आणून त्यांना टेक्सटाईल उद्योगाचे प्रशिक्षण तसेच उद्योगांना भेटी आयोजित केल्या. त्यातून २७ जणांनी यात सहभाग घेतला. हे सर्व उद्योजक हे अनुसूचित जातीतील आहेत, हे विशेष.

साडे १३ कोटी रुपयांचे भांडवल व १० कोटींची अत्याधुनिक यंत्रसामुग्री

प्रत्येक उद्योजकास ५० लक्ष रुपये भांडवल; असे साडे तेरा कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा  उद्योग केंद्राच्या शिफारशीनुसार, युनियन बॅंकेने दिले आहे. या शिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत १० कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक यंत्रे या युनिटला अनुदानावर मंजूर झाले आहेत. तसेच साडेपाच कोटी रुपये निधी हा या परिसरातल्या रस्ते पाणी आणि विज या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित आहेत. मधल्या कोरोना काळातही मोठ्या जिकरीने ह्या उद्योजकांनी आपला उद्योग उभारण्याचे काम  सुरु ठेवले होते.दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली होती. त्यांच्या निर्देशानुसार, या कामाला आणखी गती आली.

कापूस ते कापड

या उद्योगात कापसाच्या गाठी बनविणे, त्याचे धागे, धागे आवश्यकतेनुसार रंगविणे, धाग्याचे कापड बनविणे  आणि कापडाचे परिधाने बनविणे अशा सर्व प्रक्रिया केल्या जातात.  साधारण दिवसाला अडीच टन कापसाची प्रक्रिया या ठिकाणी होते. कापसाची एक गाठ ही  १६५ किलोची असते. एकूण उत्पादन १० हजार परिधानांचे होते. त्यात शेलापुर येथे धाग्याचे कापड बनविणे, रंगविणे याप्रकारची युनिट्स आहेत. तर बोरगाव मंजू येथे कापसापासून धागे बनविणे व कापडापासून परिधाने बनविणे ही कामे होतात. येथे बसविण्यात आलेली सर्व यंत्रे ही अत्याधुनिक आहेत.६०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून  सद्यस्थितीत प्रकल्पाच्या सुरुवातीच्या अवस्थेत ११० कर्मचारी/ कामगार काम करतात. या उद्योगात कुशल महिला कामगारांची आवश्यकता असते त्या सर्व बोरगाव व जवळच्या गावांमधील आहेत. सध्या चार महिन्यापासून उत्पादन सुरु झाले आहे.

साधारण एक किलो उच्च दर्जाच्या कापसापासून ८०० ग्रॅम धागे तयार होणे अपेक्षित असते तर कापड ७०० ग्रॅम, सामान्यतः ७०० ग्रॅम वजनाच्या कापडापासून तीन मध्यम आकाराचे टी शर्ट तयार होऊ शकतात, असे कश्यप जगताप यांनी सांगितले. नुकतेच त्यांना बंगलोर येथील एजन्सी मार्फत दोन लाख टी शर्ट मॅक्स या इंटरनॅशनल ब्रॅंडसाठी तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी आपला उत्पादीत माल जसे टी शर्ट, लोअर, लेगिन्स तसेच अन्य होजिअरी उत्पादने ही स्थानिक अकोला, अमरावती येथील व्यापाऱ्यांना विकली आहेत.

    Post Views:  182


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व