महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा केंद्राकडून अन्याय : अजित पवार


 संजय देशमुख  01 Feb 2022, 7:17 PM
   

मुंबई : महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम राखली आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडणे अशक्य आहे. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी प्रयत्न करावेत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आले नाही, त्यामुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे. 
देशाला कररुपाने सर्वाधिक महसूल देणार्‍या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली. केंद्राने चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले 48 हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या केंद्रीय जीएसटीच्या बदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रुपये परत मिळाले. निधी वाटपातल्या या अन्यायाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातही स्पष्टपणे दिसत असून, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.
यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’  आहे. दरवर्षी 2 कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा 60 लाख नोकर्‍यांचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे. ‘एलआयसी’च्या आयपीओची घोषणा ही नफ्यातील शासकीय कंपनीच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचा दावा निरर्थक असून, निवडणुका असलेल्या पाच राज्यांमधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करणार्‍या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात या दिशेने केंद्र सरकारने काय केले याच उत्तर आता तरी द्यावे. मेक इन् इंडिया, आत्मनिर्भर भारत या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणाही हवेत विरुन जातील असे दिसतेय, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

    Post Views:  175


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व