दिशा हरवलेला अर्थसंकल्प : मुख्यमंत्री ठाकरे


 संजय देशमुख  01 Feb 2022, 7:16 PM
   

मुंबई : वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेले उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. लोकांची क्रयशक्ती कमी होत असताना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे, अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती परंतु लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
या व याआधीच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेपुढे अनेक स्वप्न उभी करून त्यांच्यात आशावाद निर्माण केला, प्रत्यक्षात यातील किती स्वप्न पूर्ण झाली याची स्पष्टता न करता आणखी नवीन स्वप्ने सन 2022-23 च्या अर्थसंकल्पातून लोकांसमोर मांडण्यात आली आहेत. परंतु पूर्वीच्या आणि आताच्या स्वप्नांची उद्दिष्टपूर्तीची कोणतीच दिशा हा अर्थसंकल्प दाखवत नाही. अर्थसंकल्पात 2047 पर्यंतची अर्थविकासाची दिशा देण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने सन 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करतांना 2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर देणार हे स्वप्न ही केंद्र सरकारने दाखवले होते. आज 2022 साल सुरू झाले आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न खरंच दुप्पट झाले का, प्रत्येकाला घर मिळाले का याचे कोणतेही उत्तर हा अर्थसंकल्प देत नाही. या आश्वासनपूर्तीला केंद्र सरकार कुठे कमी पडले, आपण तिथपर्यंत कधी पोहोचणार याची दिशाही यात दाखवलेली नाही. म्हणजे जुनी स्वप्ने विसरून नव्या स्वप्नांना रुजवण्याचे प्रकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होत आहेत की काय अशी मनात शंका येते असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

    Post Views:  194


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व