दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच; वेळापत्रकात कोणताही बदल नाही


शिक्षणमंत्री-बोर्ड अध्यक्षांच्या बैठकीत शिक्कामोर्तब
 संजय देशमुख  02 Feb 2022, 8:13 PM
   

पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार असून ठरलेल्या वेळेतच पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी शिक्षणमंत्री आणि बोर्ड अध्यक्ष यांच्यात बैठक पार पडली असून, त्या बैठकीमध्ये या विषयावर खल झाला आहे. 
धारावीत झालेल्या घमासान आंदोलनानंतर परीक्षेत काय बदल होणार का? असा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित झाला होता. परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी आंदोलनावेळी करण्यात आली होती. दोन दिवसापूर्वीच हजारो विद्यार्थी अचानक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमले होते, त्यानंतर या विद्यार्थ्यांचा मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर परीक्षांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वसन शिक्षमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यामुळे परीक्षांचे काय होणार? परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन होणार? असा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाला आहे.
धारावीतल्या विद्यार्थी आंदोलनाने फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. हे आंदोलन एवढे आक्रमक होते की सुरुवातीला राज्य सरकारला घाम फुटला. यानंतर राज्याचे पोलिस खातेही खडबडून कामाला लागले आणि या आंदोलनामागील शक्ती शोधण्यास सुरुवात झाली. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला दोषी धरत हिंदुस्थानी भाऊला अटक केली आहे. कोर्टाने त्याला तीन दिवसांची कोठडीही सुनावली आहे. मात्र, या आंदोलनानंतर भाजपनेही राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता पोलिस लाठीमार करत आहेत, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. त्यामुळे परीक्षांबाबत काय करायचे? यासाठी शिक्षण विभाग आणि राज्य सरकारकडून काही तातडीच्या बैठका घेण्यात आल्या.
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने पुन्हा सर्वांच्या मनात धडकी भरवली होती, त्यामुळेच परीक्षा ऑनलाइन घ्या, अशी मागणी जोर धरत होती. मात्र, आताचे सद्य:स्थितीचे आकडे पाहिल्यास कोरोनाचा जोर बर्‍यापैकी ओसरल्याचे दिसतोय आणि गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षा तरी ऑफलाइन घ्याव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. हेच डोळ्यासमोर ठेवून परीक्षा ऑफलाइन होणार असल्याची माहिती आहे.

    Post Views:  282


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व