मुंबई - एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केलं. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले. शिवसेनेच्या इतिहासातील आजवरचं हे सर्वात मोठं बंड मानलं जात आहे. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटानं शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार भाजपाच्या एका केंद्रीय नेत्यानं दावा केला की शिवसेनेतील आमदारांच्या बंडाचे परिणाम खासदारांवरही पाहायला मिळतील. शिवसेनेच्या १९ पैकी कमीतकमी डजनभर खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली. यावर ठाकरेंची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पण शिवसेनेच्या बैठकीनंतर शिंदेंवर पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे खासदारांनी केलेल्या विनंतीला उद्धव ठाकरेंनी केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदारांच्या बैठकीत तीन खासदार अनुपस्थित होते. यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे लोकसभेत एकूण १९ तर राज्यसभेत तीन खासदार आहेत.
कल्याणमधून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले श्रीकांत शिंदे याआधीच वडीलांचीच भूमिका घेतली आहे. तर यवतमाळमधून पाचवेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून शिंदे गटाची बाजू मांडली होती आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची विनंती केली होती. ठाण्याचे खासदार राजन विचार देखील शिंदे यांचे समर्थक मानले जातात.
Post Views: 227
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay