चालणे आरोग्यासाठी चांगले असते हे आता कोणी नवीन सांगण्याची गरज नाही. पण, वेगात चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते, हे अनेकांना कदाचित माहीत नसेल. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अलीकडील संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, ज्या स्त्रिया वेगाने चालतात त्यांना हार्ट फेल होण्याचा धोका ३४ टक्के कमी असतो. संशोधकांनी ५० ते ७९ वयोगटातील २५ हजार १८३ महिलांच्या आरोग्य नोंदींचे विश्लेषण केलं. त्यात महिलांच्या चालण्याच्या वेगाचाही उल्लेख होता. या सहभागींचा सुमारे १७ वर्षे अभ्यास करण्यात आला. यादरम्यान १ हजार ४५५ महिलांना हृदयविकाराचा झटका आला. ज्या महिलांचा चालण्याचा वेग 4.8 kmph पेक्षा जास्त आहे त्यांना धोका ३४ टक्के कमी होता, तर ज्यांचा सरासरी वेग 3.2 kmph च्या जवळपास होता त्यांना २७ टक्के कमी धोका होता.
अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. चार्ल्स ईटन यांच्या मते, चालण्याचा वेग हा हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला वेगाने चालता येत नसेल तर तुम्ही सतर्क राहावे. ज्या महिलांना धोका होता, त्यांच्या हृदयातून शरीराला पुरेसे रक्त मिळण्याची प्रक्रिया विस्कळीत होत होती. ही वृद्धत्वाची समस्या असून ती चांगल्या जीवनशैलीद्वारे सुधारली जाऊ शकते. जलद चालण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया संतुलित राहते, असे संशोधकांचे मत आहे. हृदय चांगले काम करते. यामुळे हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा धोकाही कमी होतो. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, हळू चालण्यामुळे हृदयाच्या स्नायूंना काही प्रकारचे नुकसान देखील होऊ शकते. अभ्यासाचे परिणाम स्पष्टपणे दर्शवतात की, वेगवान चालणाऱ्यांना हळू चालणाऱ्यांपेक्षा अधिक फायदे मिळतात.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या अभ्यासाने ब्रिटनमधील २७ हजार महिलांवर केलेल्या पूर्वीच्या संशोधनाला आणखी बळकटी मिळते. त्यामध्ये असे म्हटले आहे की, जलद चालणाऱ्यांना हृदयाशी संबंधित धोका २० टक्के कमी असतो. परिणामांवरून हे देखील स्पष्ट झाले आहे की चालण्याचा वेग सुधारून तुम्ही हृदयाचे आरोग्य चांगले ठेवू शकता.
संशोधकांचा असा विश्वास आहे की, आठवड्यातून एक तास जरी वेगाने चालले तरी धोका कमी होऊ शकतो. हे आठवड्यातून दोन तास मध्यम किंवा संथ गतीने चालण्यासारखे आहे. म्हणजेच ज्या महिलांना वेगाने चालता येत नाही त्यांच्यासाठीही सरासरी वेगाने चालणेही फायदेशीर ठरते. इतकंच नाही तर कमी कालावधीसाठी वेगाने चालणे हे आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम करण्याइतकेच फायदेशीर आहे.
Post Views: 220
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay