‘टीईटी’ घोटाळ्यात आएएस अधिकारी; कृषी खात्याच्या उपसचिवाला अटक
पुणे सायबर पोलिसांची कारवाई
पुणे : शिक्षक परीक्षा घोटाळ्यात राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकार्याचा हात असल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. कृषी विभागाचे विद्यमान उपसचिव आणि टीईटी घोटाळा होत असताना शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे.
टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मधे ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या सांगण्यावरून सुशील खोडवेकरने जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले आणि या कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले. हे सगळे करण्यासाठी उपसचिव सुशील खोडवेकरला पैसै मिळाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याचबरोबर या प्रकरणात अटक असलेला तुकाराम सुपेचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर हा वेळोवेळी मंत्रालयात जाऊन सुशील खोडवेकरकडून टीईटी घोटाळ्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करून घेत होता. पोलिसांच्या तपासात हे उघड झाल्यानंतर खोडवेकरला ठाण्यातील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. यामुळे या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांचा तपास आता मंत्रालयापर्यंत पोहोचलाय.
दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालेय. त्यांची माहिती राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला देण्यात आली आहे. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींनाही अटक करण्यात येईल, असे पुणे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सनदी अधिकारी खोडवेकरला अटक
टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकरला अटक करण्यात आली आहे. खोडवेकर याला ठाण्यातून अटक करण्यात आली असून, दुपारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने खोडवेकरला 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खोडवेकर हे यापूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. खोडवेकरने शिक्षक भरती परीक्षेत घोटाळा केल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
घोटाळा कसा होत होता?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेपरीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणार्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे. घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्सअपवर पाठवित होता. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक सत्र सुरूच राहणार
टीईटीमध्ये 7800 अपात्र उमेदवार पात्र ठरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे आणखी लोकांना यामध्ये अटक होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात वेगवेगळया ठिकाणाहून आतापर्यंत 40 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरतीमध्येही सहभागी आहेत. कोरोनाच्या तिसर्या लाटेत काही पोलिस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याने कर्मचारी कामावर नव्हेत. त्यामुळे तपासही थंडावला होता. मात्र, पुन्हा तपासाची चक्रे वेगवान झाली आहेत.
Post Views: 377