वाइन विक्रीला आडकाठीचे संकेत; निर्णय बदलल्यास वाईट काही नाही : पवार
पुणे : राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही, असे विधान महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी केल्याने येत्या काही दिवसात सरकारकडून हा निर्णय मागे घेण्याचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाइन विक्रीला परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर इतरही अनेकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
वाइन आणि इतर लिकर यांच्यातील फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या गोष्टींबाबत वेगळा निर्णय घेतला तरी माझा काही त्याला विरोध असायचे कारण नाही. देशभरातील अनेक राज्यांमधील दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाइनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वायनरी आहेत. 18 वायनरी उत्पादन घेतात. ही वाइन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही असेही शरद पवार म्हणाले. सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने वाइनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय 27 जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.
वायनरी धोरणांतर्गत होता निर्णय
राज्याचे वाइन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकर्यांना फायदा व्हावा, तसेच, वाइन उद्योगास चालना मिळावी या हेतूने राबविण्यात येत आहे. वाइन उद्योगास चालना मिळण्यासाठी पर्यायाने शेतकर्यास त्याच्या मालास योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने वाइन उद्योगाची वाढ तसेच, वाइनचे परिणामकारक विपणन होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या फळे, फुले, केळी व मधापासून वाइन उत्पादित करण्यात येते. ज्या वायनरी वाइन तयार करतात व त्याबाबत विपणन करण्यास असमर्थ आहेत, अशा वाईनरींनी उत्पादित केलेली वाईन थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना व पर्यायाने राज्यातील शेतकर्यांना मिळू शकेल.
Post Views: 263