अहमदनगर : मनुष्यबळ अपुरे असल्याने सरकारने पहिल्या टप्प्यात ५ हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गृहमंत्री वळसे यांच्या हस्ते येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील ई- टपाल कक्षाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर वळसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते. पोलिसांना सुविधा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पोलिसांचे वर्तन असले पाहिजे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे कमी कसे होतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पोलिसांना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर जनता दरबार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे वळसे म्हणाले.
राज्यात ८७ पोलीस स्टेशनच्या इमारतींना मंजुरी
राज्यातील ८७ पोलीस ठाण्यांच्या इमारतींना मंजुरी देण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशनच्या इमारतींबरोबर पोलिसांसाठी नव्याने वसाहती उभारण्याचा सरकारचा मानस आहे, असे वळसे म्हणाले.
Post Views: 229
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay