मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न एका विशिष्ठ वर्गाकडून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तिकरण कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. तसेच, महाराष्ट्राता अमोल कोल्हेंचा तो चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
डॉ. अमोल कोल्हे कलाकार असले तरी ते एका पक्षाचे खासदार आहेत त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे. कलाकार म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि नथुरामचे उदात्तीकरण करणे हे दुर्दैवी आहे. नथुराम गोडसेला नायक बनवण्याचा हा प्रयत्न चुकीचा पायंडा पाडणारा आहे. याआधीही काही कलाकारांनी गोडसेच्या भूमिका केल्या त्यावरही लोकांनी तीव्र नापसंती व संताप व्यक्त केला होता. डॉ. कोल्हे नथुरामची भूमिका करण्याबद्दल देत असलेले स्पष्टीकरण अत्यंत तकलादू व न पटणारे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा थेट इशाराच नाना पटोलेंनी दिलाय. तसेच, शरद पवार यांनी यात लक्ष घालावं, जर चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला तर राष्ट्रवादीची भूमिका दिसून येईल, असेही त्यांनी म्हटलं. राजधानी दिल्लीत झी 24 तास वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भूमिका मांडली. तर, काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधींसोबत नाना पटोलेंची याबाबत चर्चा झाली आहे. तसेच, राहुल गांधींच्याही कानावर हे प्रकरण घालण्यात आले आहे. त्यामुळे, आता राष्ट्रवादी यासंदर्भात काय भूमिका घेते ते स्पष्ट याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हेंच्या सारवासारवीला अर्थ नाही
नथुरामच्या भूमिकेबद्दल भारतीय जनता पक्षाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया काही नवीन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व नथुराम गोडसे बद्दलचे विचार सर्वांना माहित आहेत. परंतु डॉ. कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करून गांधी हत्येचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. डॉ. कोल्हे आता कितीही सारवासारव करत असले तरी त्याला काहीही अर्थ नाही.
75 वर्षांनंततरही गांधींचा विचार
देशातील एका विशिष्ट विचारसरणाचे लोक सातत्याने नथुरामला जिवंत करुन महात्मा गांधींचा अपमान करत असतात परंतु ७५ वर्षानंतरही महात्मा गांधींच्या विचाराचे महत्व कमी झालेले नाही उलट जगातील विविध देश महात्मा गांधींच्या विचाराचा वारसा घेऊन वाटचाल करत आहेत ही त्यांच्या विचाराची ताकद आहे. आपल्याच देशातील काही लोक मात्र महात्मा गांधींचे विचार पुसण्याचे काम करत आहेत परंतु गांधी विचार व त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान जनता विसरलेली नाही व विसरणारही नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
Post Views: 170
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay