माफी न मागितल्यास धोतर फाडू; मराठा क्रांती मोर्चाचा भगतसिंह कोश्यारी यांना इशारा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  28 Feb 2022, 8:12 PM
   

औरंगाबाद ः राज्यपालांनी माफी मागावी, अन्यथा गरज पडली तर त्यांच्या वयाचा विचार न करता धोतरही फेडू, असा इशारा औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच घेरले गेले आहेत. राज्यपालांची तत्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे होत आहे. 
औरंगाबादमधील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वादंग उठले आहे. चाणाक्यांशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल आणि समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, गुरूंचे महत्त्व मोठे असते, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा शिवप्रेमींनी आक्षेप घेतला असून, महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा धोतर फाडण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. कारण नसताना राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रभर निषेध केला जात असून, यावरून सामाजिक अन् राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. माहिती नसलेला इतिहास आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरे तर हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या पोटात जे होते, ते ओठावर आले आहे. राज्यपालजी, आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज कळले नसतील, तर कृपया त्या विषयात नाक खुपसू नका. चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नका, तुमच्या वयाचा विचार करता, तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, हे तुमच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानांनी तत्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. यांना छत्रपती शिवाजी महाराजच कळलेले नाहीत. राज्यपाल महोदय, आपण तत्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचे धोतर फाडू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना दिला. 
राज्यपालांचे खोडसाळ वक्तव्य...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रविवारी औरंगाबादच्या दौर्‍यावर होते. येथील तापडिया रंगमंदिरात एक दिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलन आयोजित कऱण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. आपला समाज आणि राष्ट्र बलशाली होण्यासाठी संत विचारांचा प्रवाहीपणा आवश्यक असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात समृद्ध गुरुपरंपरा चालत आलेली आहे. मानवी जीवनात सद्गुरू लाभणे ही मोठी उपलब्धी आहे. चाणाक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरु का बडा महत्त्व होता है, असे वक्तव्य राज्यपाल यांनी केले होते.
खासदार उदयनराजे भोसलेंची राज्यपालांवर टीका
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खर्‍या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरू नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देऊन चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
कोश्यारींविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, या कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्र पोस्ट करत राज्यपालांचे म्हणणे खोडून काढले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे स्पष्ट झाले असून, शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यात गुरू शिष्याचे नाते असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.  येथील आकाशवाणी चौकात रस्त्यावर उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे आकाशवाणी चौकात काही काळ तणावाचे वातावरण होते.
राज्यपालांचे स्पष्टीकरण...
छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहेत. माझी माहिती आणि अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू आहेत. पण, इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहील, असे स्पष्टीकरण भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे. दरम्यान, माफी मागण्याबाबत केलेल्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. माफी मागण्याबाबत त्यांनी बोलणे टाळल्याचे पाहायला मिळाले. ते आज जळगावमध्ये बोलत होते.

    Post Views:  330


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख