एक कठोर शिस्तीचे अध्यात्मवादी कर्मसाधक यशस्वी सहकार मार्गदर्शक ..... स्व.स्वामी शांतानंद सरस्वती ...!
बोले तैसा चाले त्याची वंदावीपाऊले या संत संदेशानुसार अवलोकन करून माणसं ओळखण्याचा छंद, तशा सवयी जीवनात जोपासल्यास भिन्न विचारांच्या, व विशिष्ट तत्वप्रणालीनुसार व्यवहारीक जगतात सर्वसामान्न्यांप्रमाणे मार्गोत्क्रमण करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये संतत्वाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही.मंदिरं आणि प्रार्थनास्थळांमध्ये देव शोधणाऱ्या लोकांपेक्षा स्वत:मधील मनुष्यत्व जागवून कर्म आणि ज्ञानयोगानेच देवत्व समजून घेणाऱ्या व्यक्तींनाच घडविण्याचा प्रयत्न करणारे असामान्न्य पुरूषच सामाजिक विकासाच्या प्रक्रियेतील देवदुत ठरत असतात.
अशा व्यक्ती समाजात आपल्या अवती भोवती राहूनच त्यांच्या पध्दतीने विशिष्ट क्षेत्रात क्रियाशील राहून कार्य करीत असतात आणि कर्मकठोरतेने, शिस्तबध्द पध्दतीने त्यांच्या सहवासातील ईतरांनीही समाजसाधना अशाच पध्दतीने करीत राहिले पाहिजे हिच त्यांची तळमळ आणि एक माफक अपेक्षा असते.
अशाच कर्मकठोरतेने, आगळ्यावेगळ्या शिस्तबध्द वाटचालीने,अभ्यासू वृत्तीने, आध्यात्म आणि व्यवहाराची सांगड घालून लक्षणिय उच्चांकाने आपली कर्मसाधना सिध्द करणारी सहकार क्षेत्रात नांवलौकीक प्राप्त केलेली असामान्न्य,कर्तव्यतत्पर व्यक्ती म्हणजे स्व.स्वामी शांतानंद सरस्वती महाराज...! ज्यांना आयुष्यभर सगळे महाराज म्हणूनच ओळखत होते.परंतू त्यांना महाराज होऊन मानसन्मान मिळवून राहण्याऐवजी समाजात मिसळून साध्या माणसाप्रमाणे जीवन व्यतित करणेच आवडत होते.
कोकणस्थ ब्राम्हण घराण्यात जन्मलेली एक व्यक्ती....... मुंबई सारख्या महानगरात जीवन घालवते.बालपण,तारूण्य,
महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्जनासोबतच मित्रांच्या गोतवळ्यातील समुहजीवनातील सगळे आनंदाचे क्षण उपभोगतेय.सुखसंपन्न घराणं ...वडीलांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी असल्याने घरात कशाचीही उणीव नव्हतीच.....तरीही तारूण्यातच अंतिम सत्याचा ध्यास घेत आनंदाच्या शोधातच हरवल्याचं त्यावेळी त्याच्यामध्ये सगळ्यांना जाणवत होते.ब्राम्हण घराण्यात जन्म घेतल्यावरही फक्त कर्मकांडावर विश्वास न ठेवता मानवी जीवनमुल्यांची शिदोरी सोबत घेऊन एक अनुभवजण्य व शिस्तबध्द जीवन जगण्याच्या विचारातच आपली निश्चित दिशा शोधण्याचा प्रयत्न ते करत होते.....
या तंद्रीत वाटचाल करतांनाच माणसामध्येच देव आहे,तो प्रथम जागविला पाहिजे.त्याकरीता त्यालाच सन्मार्गावर लावण्याकरीता वाटाड्याची भुमिका जरी बजावता आली तरी आपल्या जन्माचे सार्थक झाले म्हणून समजावे. या विचाराने स्वत:च्याच विश्वात रममाण राहिल्याने, त्याच त्या अट्टाहासाने मग त्या परिवारातील असोत, वा समाजातील, या सर्वांपेक्षा भिन्न ठरल्यामुळे मतभेद हे ओघाने आलेच.......
असे सर्वांच्या नाराजींना पचवत स्वत:च्या मनाला एका वेगळ्या आनंदविश्वाकरीता राजी करून घराबाहेर पडून अंतिम सत्त्याच्या दिशेने येऊन पोहचलेली एक व्यक्ती म्हणजे स्व.स्वामी शांतानंद सरस्वती महाराज होत.....ज्यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे!
विदर्भाच्या पुण्यपावण भुमीतील समाजोध्दारक संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधन आणि सेवाकार्याने अगोदरच प्रभावित असलेल्या स्वामी शांतानंद सरस्वती यांची एक दिवस संत गाडगे महाराजांसोबत भेट झाली,आणि त्यांनी सांगीतले "खरे सेवाकार्य करायचे असेल तर माझ्या विदर्भात ये" हिच घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.आणि एवढ्या शब्दांवर विश्वास ठेऊन अगोदरच विवाह करण्याचा निर्णय रद्द ठरविल्याने आई वडीलांची नाराजी पत्करून, घरातील "सतिश" हे नांव असलेल्या या बुवांनी कायमचा घराबाहेर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. ....
ही पूर्वार्धाची कहाणी आहे अकोल्यातील व पूर्वीच्या गोरेगांव येथून स्थापन झालेल्या सहकारातील सर्वोत्कृष्ट ठरेलेल्या मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्षांची...... स्व.स्वामी शांतानंद सरस्वती महाराज यांच्या जीवनातील वाटचालीच्या प्रारंभाची.......हिच पतसंस्था सहकारक्षेत्रातील एक आदर्श मॉडेल ठरविण्यात त्यांनी परिश्रम घेतले .....आणि त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री,मा.पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री मा अजित पवारांचे हस्ते शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार मिळवून शिक्कामोर्तबही करून ठेवले आहे.......
विदर्भात पाऊल ठेवल्यानंतर ते अकोला,माझोड जवळील गोरेगांव खुर्द येथे स्थिरावले. तिथे नामसंकिर्तन, भागवत प्रवचनातून प्रबोधन आणि मंदिरांच्या उभारण्यांचे कार्य करतांनाच त्यांना पंचक्रोशीतील अनुयायांकडून आपसुकच महाराज ही उपाधी प्राप्त झाली.परंतू पाय धुणे आणि तिर्थ घेणे या भाबड्या विभूती पुजेला त्यांनी दुर ठवले.त्यापेक्षा समाजाच्या विकासाला पुरक असे
स्विकारून कर्मयोग राबविण्याचा संदेश ते देत राहिले... प्रसंगी न ऐकणारांना फटकारतही राहिले.....त्यांनी गोरेगाव आणि परिसराच्या विकासाकरीता व्यवसायाच्या अनेक कल्पना राबवून पुढे भजन आणि भागवत सप्ताहापेक्षा समाजाकरीता व्यवहार करावा,श्रमिक सुशिक्षित बेरोजगार यांना जोडधंद्यांसाठी,व्यवसायांसाठी पतपुरवठा व्हावा म्हणून मानवधर्म पतसंस्थेची स्थापना केली.संख्येपेक्षा गुणात्मक वाढीवर भर देत
शिस्तबध्द आणि पारदर्शक व्यवहाराने लाखोच्या व्यवहातून अकोला येथे स्थलांतरीत केलेली ही संस्था कोट्यावधीमध्ये परावर्तित होऊन आपली एक अभिनव ओळख घेऊन आज अकोल्यात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
अध्यात्मिक ज्ञान, अनुभूती, उपासना या विषयांसोबतच समाजाच्या विकासाच्या प्रश्नांवर तथा सहकारक्षेत्रातील त्यांचा प्रचंड अभ्यास पाहता अध्यात्मिक क्षेत्रातील संत, महात्मे, शंकराचार्यांसोबतच विदर्भातील व ईतर ठीकाणावरील अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते भेटून त्यांच्यासोबत चर्चा करीत असत.रामजन्मभुमीच्या कारसेवेत ते विदर्भ प्रांताधिकारी होते.एक स्पष्टवक्ते, कुण्याही मोठ्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला तोंडावर जाब विचारणारी कडक,परखड व्यक्ती, शिस्तपालनामध्ये अत्यंत कठोर .ती तोडणारा परत ती चुक करू शकणार नाही, ईतक्या स्पष्ट आणि कठोर शब्दात त्याला दिली जाणारी समज, म्हणजे प्रत्यक्ष जमदाग्नी ऋषींची आठवण व्हावी...... गोरेगांवच्या वाकोडे,डंबाळे व समाजातील असंख्य नागरीकांनी त्यांना महाराजांचे स्थान देऊन आपल्य ह्दयात जपले.त्यांची कडक शिस्त व अनुचित ठीकाणी फटकारण्याच्या स्लभावाला स्विकारुन त्यांच्यातील आदर्शाचे पुजन करून गोरेगावात २५-३० वर्ष मनोभावे सेवा केली.
असं हे व्यक्तीमत्व होत.परंतू आपली स्वत:चीच काहीतरी गफलत होते आहे, हे लक्षात आल्यावर समोरचा कितीही लहान असला तरी त्याला "स्वारी" म्हणण्याचा मनाचा मोठेपणाही त्यांनी मवाळ भूमिकेतून अनेकदा दाखविला.
दिलेला शब्द आणि सांगीतलेली वेळ जीवनात कधीही चुकू द्यायची नाही, ही कठोर साधना त्यांनी शेवटपर्यंत पाळली.
सन २००२ पासून मी या अशा असामान्न्य शिस्तबध्द व्यक्तींच्या स़ंपर्कात राहिलो.मानवधर्म पतसंस्थेला लहानातून मोठेपण प्राप्त करून देतांना अनेक बदल, स्थित्यंतरं आमच्या अनूक संचालकांनी जवळून बघितली.जीवनाला आकार देतांना माझ्या प्रवासात आध्यात्म, मानवतावाद,मानवी जीवनमुल्यांची जाणीव देणारे प्रथम स्वामी जोमानंद,त्यानंतर प्रशासन, राजकारण, समाजकारण आणि मानसिक विकासाचे धडे देणारे त्रिपूरा,बिहार आणि प.बंगालचे माजी राज्यपाल,पद्मश्री शिक्षणमहर्षी डॉ.डी.वाय.पाटीलसाहेब आणि त्यानंतर शिस्त, वेळ, प्रशासनआणि सहकाराचा परिचय देऊन स्पष्टवक्तेपणा शिकविणारी मला मिळालेले एक अनुभवसिद्ध पुरूष म्हणजे स्व. स्वामी शांतानंद सरस्वती महाराज आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप होतं,म्हणून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि सामान्यजण ही त्यांना भेटत. परंतू परखड आणि सत्त्य बोलण्यामुळे प्रत्येकाचा कस लागून चाळणी लागत होती.त्यामुळे सत्त्य स्विकारण्याची तयारी आणि ऐकून घेण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे,ते येत होते भेटत होते.
ही समाजाकरीता जगणारी संन्यासी व्यक्ती होती त्यामुळे कोण राहील, कोण जाईल याची त्यांना तमा नव्हती. आजारपणात आयकॉन हॉस्पीटलमध्ये असतांनाच संजुबाप्पू माझे अंत्यसंस्कार कुठे करणार म्हणून या त्यांना आता मृत्यू येणार ही जाणीव होत होती. तो साध्या माणसाप्रमाणे साधाच अग्नी देऊनच करा ही ईच्छा सांगणेही शेलटच्या क्षणात होतंच याप्रमाणेच अनेकांशीही असंच बोलले पण होते! परंतू त्यांना चिंता होती ती समाजाकरीता निर्माण केलेली सहकारातील आई मानवधर्म त्या संस्थेची माझ्या पश्चातही योग्य जोपासना होईल ही खात्री मनोमन बाळगूनच त्यांनी दि १४ जानेवारी २०२० च्या रात्री १२ नंतर आपला येथील जीवनप्रवास कायमच संपविला.परंतू त्यांच्या संदेशातील प्रेरणा ह्य सहकार आणि सामाजिक विकासाच्या प्रक्रियेतील प्रभावी मुलमंत्र ठरणार यात शंकाच नाही......
त्यांच्या व्दितीय पुण्यस्मरदिनी त्यांच्या स्मृतीस मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ सहकारातील व लेखापरीक्षण खात्यातील त्यांचे जीवाभावाचे अनेक अधिकारी,कर्मचारी वृंद,व अनुयायांकडून विनम्र अभिवादन तथा भावपूर्ण श्रध्दांजली... !
संजय देशमुख, संपादक-विश्वप्रभात
अध्यक्ष-मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था मर्या, अकोला
Post Views: 442