महसूल विभागाकडे वारंवार तक्रार करून ही,महसुल विभाग कारवाई करण्यास करते टाळाटाळ
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Jun 2023, 3:22 PM
(संतोष घरत) पालघर - पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिवासी, सरकारी वन विभागाच्या जमिनीवर भूमाफिया अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू असल्याबाबत प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्ध होऊन सुद्धा महसूल विभाग कारवाई करीत नसल्याने मसूल विभागावर संशय व्यक्त होताना दिसत आहे.
महसूल विभागाने बोईसर मध्ये काटकर, दांडी ह्या महसुली क्षेत्रामध्ये कारवाई केली आहे . तोडक कारवाईनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकामे महसुल विभागाच्या आशीर्वादाने सुरू होत असतात ,अशी जनतेमध्ये कुजबुज ऐकायला मिळत आहे.

मौजे काटकर बोईसर गट नंबर ३०/१ ते ६४/१३ मध्ये एकूण क्षेत्र ०.६१.००हे.आर. या आदिवासी जमिनीवर बिगर आदिवासी ने बांधकाम करत अनेक पत्र्याच्या व आरसीसी इमारती व घरे तयार केले आहेत. याबाबत संदीप जयवंत गोरखाना ह्यांनी डिसेंबर२०२२ पासून महसूल विभागाकडे लेखी तक्रार करून सुद्धा त्या अनधिकृत सुरू असलेल्या बांधकामावर आजपर्यंत कोणतीच तोडक कारवाई केली नाही, म्हणून त्यांनी पुन्हा १ जून २०२३ रोजी तहसीलदार यांना लेखी तक्रार केली आहे. की आमच्या आदिवासी जागेमध्ये बिगर आदिवासी इसमाने आमची व आमच्या परिवाराची दिशाभूल करून आमची फसवणूक केली आहे . आमच्या अज्ञान पणाचा फायदा घेत आमची जमीन बळकावून त्या ठिकाणी दिवस रात्र काम करून अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. हे बांधकाम करताना संबंधित विभागाची परवानगी न घेता ,गौण खनिजाचा परवाना न घेता मोठ्या प्रमाणात शासनाचा पैसा बुडवून हे काम सुरू आहे. डिसेंबर २०२२ पासून तक्रारदार संदीप गोरखाना यांच्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न निर्माण होऊन महसूल विभागावर संशय व्यक्त केला जात आहे.
Post Views: 341