विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वूमन डॉक्टर्स विंग, आयएमए, अकोला यांच्या वतीने आयोजित \'आनंदी गुरुकुल अभिनय कार्यशाळा – २०२६\' उत्साहात संपन्न
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
08 Jun 2026, 6:36 PM
अकोला : वूमन डॉक्टर्स विंग, आयएमए, अकोला २०२६-२७ यांच्या वतीने आयोजित 'आनंदी गुरुकुल अभिनय कार्यशाळा – २०२६' ही विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.
अकोला महानगरातील विद्यार्थ्यांचा अभिनयासोबतच सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. अभिनय, संवादकौशल्य, मंचावरील वावर, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी आणि प्रभावी अभिव्यक्ती या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. दीपाली आतिश सोसे यांनी विद्यार्थ्यांना अभिनयकलेचे तंत्र,संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले.
प्रा.डॉ.दीपाली सोसे या ६६ प्रकाशित पुस्तकांच्या लेखिका असून त्यांना देशभरातील ७६ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणलोट विभागाच्या माजी जिल्हा प्रशिक्षण समन्वयक, 'नाट्यशास्त्र' विषयात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या, प्रख्यात लेखिका, शिक्षणतज्ज्ञ, मराठी भाषा अभ्यासक आणि 'अभिनय गुरु' म्हणून त्यांची ओळख आहे.
सहप्रशिक्षक म्हणून प्रा.आतिश सुरेश सोसे यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी संवाद, मंच संचालन, व्यक्तिमत्त्व विकास आणि सादरीकरण कौशल्य यांवर मार्गदर्शन केले. ११५ प्रकाशित पुस्तकांचे लेखक असलेल्या प्रा. सोसे यांच्या 'महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील' या चरित्रग्रंथाचे जर्मन, इंग्रजीसह तब्बल चोवीस भारतीय भाषांमध्ये आणि नऊ लिपिंमध्ये अनुवाद झाले आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सहसंपादक, समुपदेशक, सूत्रसंचालक, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासू वक्ते म्हणून परिचित आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन वूमन डॉक्टर्स विंग, आयएमए, अकोला यांच्या अध्यक्षा डॉ. किरण गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. शितल मुरारका, डॉ. रेखा विरवानी, कोषाध्यक्ष डॉ. स्मिता भट तसेच वूमन डॉक्टर्स विंगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यशाळेला डॉक्टर कुटुंबीयांच्या पाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवित अभिनय, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रभावी अभिव्यक्ती यांचा सराव केला.कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांचे सादरीकरण घेण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित पालकांनी कार्यशाळेच्या उपयुक्ततेचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी वूमन डॉक्टर्स विंग, आयएमए, अकोला आणि आनंदी गुरुकुल द ग्रूप ऑफ एज्युकेशन, अकोला यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले.