युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात; दिल्लीत मंत्री अब्दुल सत्तारांचे विधान
नवी दिल्ली ः देशभरातले पूल बांधणारे मंत्री म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी हेच शिवसेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतात, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केले. नवी दिल्लीत आज त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र येण्यासंदर्भातले हे वक्तव्य केले. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यात हे सरकार फार काळ टिकणार नाही, अडीच वर्षे होताच भाजप-शिवसेना पुन्हा जवळ येतील अशी चर्चा असतानाच अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना असे वक्तव्य केले. राज्यात कोणतेही परिवर्तन घडवायचे असेल त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरी यांच्यासोबत आमचे जुने संबंध आहेत. त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत. मग ते विरोधक का असेनात. गडकरी हे राजकारणातील विद्यापीठ आहेत. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचेही जुने संबंध आहेत. मात्र राज्यातील भाजप नेत्यांच्या राजकारणामुळे गडकरी राजकारणात लक्ष देत नाहीत. भाजप आणि युतीचा पूल बांधायचा असेल तर ते फक्त गडकरीच करू शकतात. परंतु युतीचा निर्णय शेवटी उद्धव ठाकरेच घेतील, असे वक्तव्यही अब्दुल सत्तार यांनी केलंय.
रश्मी ताई मुख्यमंत्री पद सांभाळू शकतात....
रश्मी ताईची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून आहे. आज त्या पडद्याच्या मागे काम करत आहे. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बर्यापैकी माहिती आहे. एक महिला म्हणून त्यांचे नियोजन कसे असते, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचे बळकटीकरण कसे व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मूल न करता, त्यांना सक्षम कसे करायला पाहिजे यासाठी ताईसाहेबांचं काम मोठे आहे. रश्मीताई सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही उत्तम काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे, त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे याविषयी त्यांचे नियोजन आहे. उद्धव साहेबांनी जर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली तर त्या योग्य पद्धतीनी सांभाळू शकतील, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 297