वंदनीय ते जोपासावं अन निंदनीय ते उखडून फेकाव - डॉ गिरीश गांधी


डॉ. गिरीश गांधी अमृत महोत्सव सत्कार सोहळा: मान्यवरांची उपस्थितीत साधले विचारांचे नवनीत
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Nov 2022, 10:02 AM
   

अकोला : चांगल नेतृत्व निर्माण करण्याचं कार्य समाजाचं आहे.  लोकशाहीची सर्वसमावेशकता जपण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. जे काही करायचे आहे ते सरकारने हा समज खोडून काढावा लागेल कारण विसंबुन राहणाऱ्याच्या पदरी सदैव लाचारीच येते, त्यामुळे नागरिकांनी सजग होण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गिरीश गांधी यांनी केले.  डॉ. गिरीश गांधी अमृत महोत्सव वर्षानिमित्त अकोला येथे रविवार सायंकाळी आयोजित हृद्य सत्कार सोहळयाला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे, माजी गृहराज्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्य डॉ. रणजीत पाटील, डॉ  ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक आणि साक्षेपी समीक्षक डॉ. श्रीकांत तिडके,  ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे, गिरीश गांधी फाऊंडेशनचे श्रीराम काळे, डॉ. नरेश बजाज, डॉ. गजानन नारे  यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.       


        राजकारणात निवडून येण्याचे अन टिकून राहण्याचे प्रयत्न होत असतात. राजकारणची दिशा ठरविण्याचा अधिकार हा समाजातील प्रत्येक व्यक्तीला आहे. लोकांनी जे वंदनीय आहे ते जोपासलं पाहिजे आणि जे निंदनीय आहे ते उखडून फेकलं पाहिजे. समाज आज जागला नाही तर देश यादवीच्या उंबरठ्यावर असेल असा इशारा डॉ. गिरीश गांधी यांनी दिला.     तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या मानपत्राचे वाचन सीमा शेटे रोठे यांनी केले. डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन, अकोलाचे अध्यक्ष   डॉ. श्रीकांत तिडके यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून डॉ. गिरीश गांधींचा चालतं बोलतं व्यासपीठ म्हणून उल्लेख केला. समाजकारणात डॉ. गांधी यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. 
     डॉ. गिरीश गांधी यांनी धडपडणाऱ्या माणसाची सदैव पाठराखण केली असून महाराष्ट्रातलं ऊर्जा केंद्र असल्याचे प्रतिपादन  मीडिया वॉचचे संपादक अविनाश दुधे यांनी केले.    समर्पण, संवाद आणि सातत्य हे डॉ. गिरीश गांधी यांच्या क्रियाशील जीवनाचं सार असल्याचे बाळासाहेब कुलकर्णी यांनी नमूद केले. समाजातील विधायक कामाला संरक्षण देण्याचे काम डॉ. गिरीश गांधी यांनी केले असल्याचे माजी गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नमूद केले. डॉ. गिरीश गांधी यांनी त्यांच्या सामाजिक चळवळी मध्ये सातत्याने लोकाराधनाचे जीवनमूल्य जपले असल्याचे प्रतिपादन डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले.  तर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी सांप्रत सामाजिक तथा राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी गांधीजींच्या विचारांची आवश्यकता प्रतिपादित केली. आज डॉ गांधी समाजासाठी आपले दायित्व आहे म्हणून निस्पृह भावनेने काम करत आहेत ही विदर्भासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले. डॉ. गजानन नारे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर संचालन केले तर आभार प्रदर्शन अशोक ढेरे यांनी केले.  कार्यक्रमाला अकोल्यातील गणमान्य लोकांची आवर्जून उपस्थिती होती.             
प्रत्येक हृदयात न्यायालय निर्माण व्हावे- अरुणभाई गुजराथी         
जीवन का जगावं हे कळलं कि मग ते कसं जगावं हे कळते. डॉ. गिरीश गांधी यांचे काम समाजाला वळण देण्याचे राहिले आहे. आत्मसमर्पण आणि विवेक हा त्यांचा अंगीभूत गुण आहे. आज खऱ्या अर्थानं यश कामवावयाच असेल तर आपल्या हृदयात परखड असे न्यायालय प्रत्येक व्यक्तीने निर्माण करणे अवश्यक आहे. त्यातून मिळणारा विवेक आपणास प्रेरक आणि बोधक ठरेल असे प्रतिपादन अरुणभाई गुजराथी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.

    Post Views:  187


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व