स्वानंद-सुधा स्वर्ण , वेदपाठशाळा रौप्य महोत्सवानिमित्त आध्यात्मिक ज्ञानसत्राची पर्वणी
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
09 Jul 2022, 5:27 PM
मच्छिंद्रनाथांपासुन सुरू झालेल्या नाथपंथाच्या अखंड गुरु-शिष्य परंपरेतील १५ वे नाथगुरु चैतन्य श्री व्यंकटनाथ महाराजांच्या स्वानंद सुधा या नाथपंथाच्या सांप्रदायिक भजनाचा स्वर्ण तसेच श्री प्रह्लादाश्रम वेदपाठ शाळेच्या रौप्य महोत्सवा निमित्त अकोला नाथशक्तिपीठात दि. ११ जुलै ते १७ जुलै २२ पर्यंत भव्य आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वानंद सुधा ही भजनावली म्हणजे श्री व्यंकटनाथांची नाम-गुण व लीलेचे संकीर्तन आहे.त्यांच्या आज्ञेवरुन १९७२ साली सुरू झालेल्या या भजनास आज ५० वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच नाथशक्तिपीठाच्या वेद प्रसार प्रचार कार्यास व श्री प्रल्हादाश्रम वेदपाठशाळेस २५वर्षे पूर्ण झाली आहेत.
उद्घाटन समारंभ
दि. ११ जुलै रोजी नाथशक्तिपीठामध्ये सायंकाळी ७ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होईल. रामदासी संप्रदायाचे संतवर्य प.पू. श्री वसंत मामा दिढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्कृतचे ज्येष्ठ प्रचारक पं. वसंतराव गाडगीळ पुणे , महोत्सवाचे उद्घाटन करतील. अध्यात्मयोग महर्षि प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वचनाने सत्राची सांगता होईल. त्यापूर्वी दुपारी २ वाजता चैतन्यश्री व्यंकटनाथ महाराजांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात येईल.
ज्ञानसत्राची पर्वणी
महोत्सवात सकाळच्या १ ल्या सत्रात ९ ते १२.३० पर्यंत , नाथपंथाचे समग्र दर्शन या विषयावर दि. १२ जुलै रोजी अध्यात्मयोग महर्षि प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज , दि.१४ जुलै रोजी ह.भ.प. श्री गजानन कुळकर्णी , दि.१५ ला अध्यात्मयोग महर्षि प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज , दि.१७ रोजी डाॅ. श्रीकांतशास्त्री गदाधर यांची प्रवचनमाला होईल.
नाचू कीर्तनाचे रंगी
महोत्सवात दि. १२ व १३ व १७ जुलै रोजी कीर्तनाचे १ ले , २ रे व ६ वे कीर्तन पुष्प डाॅ. श्रीकांतशास्त्री गदाधर गुंफतील तस दि.१४ ,१५ , व १६ जुलै रोजीचे ३ /४/५ कीर्तन पुष्प ह.भ.प. श्री गजानन कुळकर्णी गुंफणार आहे.
स्वानंद-सुधा स्वर्ण महोत्सव कार्यक्रमात दररोज दुपारी ४.३० पासुन श्री व्यंकटनाथांचे नाम-गुण व लीलेचे संकीर्तन करणार्या भजनाचे निरूपणासह सादरीकरण केल्या जाईल. अध्यात्मज्ञान महर्षा प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज ही भजन स्वतः गाणार असून डाॅ. श्रीकांतशास्त्री गदाधर भजनावर निरूपण करतील.
दीक्षांत समारंभ
ओम एज्यु.सोसायटी द्वारा संचालित श्री प्रह्लादाश्रम वेदपाठशाळेतील दीक्षितांचा दीक्षान्त समारंभ दि.१६ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
रांगोळी प्रदर्शन
महोत्सवाचे दरम्यान संस्कारभारतीच्या वतीने सौ. राजश्री सुरेश कुळकर्णी यवतमाळ , श्री.धवन रोहणे अमरावती , श्री भाऊलाल देवतवाल , शीतल जाट अकोला हे तज्ज्ञ मार्गदर्शक रांगोळी प्रशिक्षण देतील.
वृक्ष पूजन
दररोज सकाळी ८ वाजता नाथशक्तिपीठाच्या परिसरातील स्वयंभू औंदुबर व नागाश्वत्थ वृक्षाचे पुरूष सूक्ताने पूजन होईल. दररोज सकाळी प्रातःकालीन काकडारतीने कार्यक्रमाची सुरूवात होईल.
कार्यक्रमात सहभागी होणार्या सर्व भाविकांच्या निवास , भोजन व चहापानाची निॅःशुल्क व्यवस्था कार्यक्रमस्थळी नाथशक्तिपीठात करण्यात आली आहे. तरी आध्यात्मिक ज्ञान सत्रात आवड असणार्या सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती नाथशक्तिपीठ परिवाराचे वतीने करण्यात आली आहे.
Post Views: 175