एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून हटवले
मुंबई : मुंबईत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईत आंदोलन करत असलेल्या संपकरी एसटी कर्मचार्यांना आझाद मैदानातून हटवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच नवी नियमावली जारी केली होती. त्यानुसार मुंबईत सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा नियम लागू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी पाच वाजल्यानंतर आझाद मैदानातील आंदोलकांना बाहेर जाण्यास सांगितले. एसटी आंदोलकांनीही सहकार्याची भूमिका घेत मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही संपकरी कर्मचार्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही सरकारने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करत आहोत. त्यामुळे आम्ही संध्याकाळी पाच वाजेनंतर मैदानातून बाहेर पडू. मैदानाबाहेर आम्ही स्वत:ची राहण्याची व्यवस्था केली आहे. पण पहाटे पाच वाजल्यापासून आझाद मैदानात पुन्हा आंदोलनाला सुरुवात होईल. एसटी राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरुच राहील, अशी भूमिका संपकरी एसटी कर्मचार्यांनी मांडली.
बडतर्फी मागे घेणे अशक्य- अनिल परब
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्यांना संप सोडून कामावर रुजू झाल्यास निलंबन रद्द करण्याचे प्रस्ताव सहा वेळा दिले. जे कामावर आले, त्यांच्यावरील कारवाई रद्द केली. पण संपावर कायम राहिलेल्या कर्मचार्यांची बडतर्फी मागे घेतली जाणार नाही, असे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले होते. मूळ वेतनात मोठी वाढ देऊनही व अन्य राज्यांमधील परिवहन कर्मचार्यांप्रमाणे वेतन देऊनही शासनात विलीनीकरणाच्या मागणीचा संपकरी कर्मचार्यांचा हट्ट आहे. या मुद्यावर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिप्राय उच्च न्यायालयास कळविल्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे परब यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले होते.
Post Views: 298