अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेच्या अध्यक्षपदी मनोज घरत
अलिबाग : अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेच्या अध्यक्षपदी सृष्टी फार्म, थळचे संचालक मनोज घरत यांची तर उपाध्यक्षपदी राजाराम पडवळ, किहीम, मानसी चेऊलकर मांडवा, स्वाती बर्वे, चोंढी यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली.
अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेची सर्वसाधारण सभा सृष्टी फार्म, थळ येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सन २०२१ ते २०२४ करिता कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. यात अध्यक्षपदी सृष्टी फार्म, थळचे मनोज घरत यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी राजाराम पडवळ, किहीम, मानसी चेऊलकर, मांडवा, स्वाती बर्वे, चोंढी, सचिवपदी बाळकृष्ण कोळी ,किहीम, सहसचिवपदी विजय कदम, अलिबाग, खजिनदारपदी अमिष शिरगांवकर,आवास यांची निवड झाली. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून कौस्तुभ भिंगार्डे, धोकोवडे, निमीष परब, आवास, प्रिती पाटील, चोंढी, नितीन नाईक, आवास, चंद्रशेखर पडवळ, वरसोली, नितीन घरत, सासवणे, आल्हाद जाधव,आवास, उमेश म्हात्रे, आगरसुरे ही कार्यकारिणी निवडण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप राऊत यांनी काम पाहिले.
याप्रसंगी मावळते अध्यक्ष निमिष परब यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज घरत यांच्याकडे संस्थेची सूत्रे दिली. याप्रसंगी बोलताना मनोज घरत म्हणाले, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेची स्थापना २ मार्च २००६ ला झाली असून संस्थेला धर्मादाय आयुक्तांकडुन नोंदणी प्रमाणपत्र ९ मे २००६ रोजी मिळाले. २००६ ते २०२१ या कार्यकाळात बिनविरोध यशस्वीरित्या ५ वेळा अध्यक्ष व कार्यकारिणी बदलण्यात आली. आज माझ्यावर अध्यक्षपदाची तसेच व माझ्या सर्व सहकाऱ्यांवर ज्या विश्वासाने संस्थेच्या २०२१ ते २०२४ साठीच्या ६ व्या कार्यकारिणीची जबाबदारी दिली गेली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या संस्थेच्या माध्यमातून पर्यटन संस्कृतीला बळ देण्याचे काम मी सहकाऱ्यांसोबत निष्ठेने करेन असेही त्यांनी सांगितले.
Post Views: 296