महाराष्ट्राची लूटमार .... घरभेद्यांचे आघाडी सरकारवरच प्रहार..! : संजय एम. देशमुख


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  28 Oct 2022, 7:46 PM
   

             मांजर डोळे मिटून चोरट्या वृत्तीने गटागटा कितीही दुध प्यायली तरीही आपल्याला कोणी बघितले नाही असा तिचा गोड गैरसमज असतो.परंतू स्वत:च्या पोटासाठी‌,आपल्याच तृप्तीच्या सुखासाठी हा चोऱ्या माऱ्यांचा तिचा सराईतपणा,इतरांच्या तोंडातील घास काढून स्वत:चंच पोट भरत राहण्याचा मतलबी निगरगठ्ठपणा असतो. हा जास्त काळ चालत नाही.एक दिवस पशुदया करणाराही नाठाळाच्या माथी हाणू काठी या तत्वाला अनुसरून तिचा कायम इलाज केल्याशिवाय राहत नाही.माणसापरिस मेंढरं बरी म्हणतात.श्वानाचा प्रामाणिकतेचा गुण माणसाने घ्यावा म्हणतात.परंतू स्वत:च्या मतलबासाठी देव आणि धर्माचा बाजार मांडून भावनांच्या तप्त अग्नीवर आपल्याच स्वार्थाच्या पोळ्या शेकणारी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक माणसे  येथे सक्रिय आहेत.ती काळे कारनामे करीत स्वत:ला माणूस मात्र घडवू शकली नाहीत.देव आणि धर्मांवर वाद करणारांनी, समाजसेवेच्या गप्पा मारणारांनी माणसांच्या भरवशावर मोठे होणारे आपण परावलंबी जीवाणू आहोत हे समजून घेतलं पाहिजे.परंतू त्यांनी  आपण माणूस सुध्दा होऊ शकलो नाही यावरही विचार केलेला नाही. हे या महाराष्ट्राचं आणि विशेषत: विदर्भाचंही फार मोठं दुर्दैव आहे....!
               अशाच या राजकीय माणसांच्या अप्रामाणिकपणाने, मतदारांप्रतींच्या कृतघ्न वृत्तीने महाराष्ट्र नागवला जात आहे.त्याला लूटून त्या पापांच्या दानाने गुजरातची झोळी भरण्याची अनाचारी आणि अन्याय्य वाटचाल सुरू आहे.त्यामुळेच आता जनतेला दिवाळी शुभेच्छांच्या गोडी गुलाबीत अडकवून ठेवत वेदांत फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला.आता नेहमीप्रमाणे केन्द्राचं मांडलिकत्व पत्करून  शेटजी आणि मोटाभाईंची गुलामगीरी करणारे सुपरपावर नेते खोटं नाटं ओरडत राहतील.आपल्या महाराष्ट्रद्रोही षडयंत्राचं खापर आघाडी सरकारवर फोडून मोकळे होण्याचा सराईत साळसुदपणा करतील.त्यांचे चेलेचपाटे अंधभक्त यावर बोगस स्पष्टीकरणं देण्याचा खोटा आततायिपणा करीत राहतील......अरे भावांनो तुमचा महाराष्ट्र हा तुमचा आहे रे....!.वसुधैव कुटूंबकम् ही विश्वव्यापी संकल्पना घेऊन आम्ही जगतो आहोत. आम्ही ढोंगी सोंगी नव्हे तर खरेखूरे मानवतावादीही आहोत....!परंतू आमच्यासोबत आमची ताटे पळविण्याच्या कुटनीतिचा अवलंब येथे केला जात आहे. त्यांना गीतेंच्या तत्वज्ञानानुसार आम्ही त्याच फूटपट्टीने मोजू शकत नाही. कारण ही हिटलरशाही मनोवृत्तीची खूजी माणसं त्या वैचारिक दर्जाची निश्चितच नाहीत. हे आम्हाला समजून घेऊन उठावाची जागृती होणे आजच्या काळाची गरज आहे. 
             स्वप्रदेशाच्या आर्थिक आणि नागरी विकासासाठी विश्वासघाताच्या मार्गाने हे सर्व काही चालू आहे. ती चढाओढ हा दोन राज्यांमधील नाही तर जसा काही दोन देशांचा संघर्ष वाटतो आहे.एवढे अक्षम्य अन्याय एका समुहात राहणाऱ्या माणसांनी आपल्याच भावंडांशी कधीही करू नयेत.धर्म.... धर्म म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या धर्मपंडीतांना ह्या गोष्टी बिलकूल शोभा देणाऱ्या नाहीत. या दिशाभूल करणाऱ्या  संमोहन आणि गुलामगीरीतून  जनता सावध कधी होणार ? जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत काय या खोट्या गुरूमंत्रांच्या भुलभूलैय्यावरच जगणार? अनेक प्रकल्प हे आघाडी सरकारच्या बेजबाबदारपणानेच गेले आहेत हे आता महाराष्ट्रातील मतदार आणि जनतेला समजावून सांगण्याची गरज राहिलेली नाही.मग नव्या सरकारमधील उसणी सामाजिक बांधिलकी स्विकारलेल्या बुध्दीमान समाजसेवकांना ते का थांबवता आले नाहीत? हे सुध्दा त्यांनी खरं खरं तेच सांगीतलं पाहिजे‌.परंतू यांच्याकडून ती अपेक्षा करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर बसवून आणि त्यांना सल्ला देऊन त्यांचेकडून महाराष्ट्र कंगाल करवून गुजरातला समृध्द करण्यासाठी सल्लागार म्हणून फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये घुसवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या खोके सरकारचा सगळा ओक्के कार्यक्रम आता चालू झालेला आहे...!
             एका मागून एक प्रकल्प राज्यातून जात आहेत,आम्ही आणि आमचे काही समाजप्रतारक  लोकप्रतिनिधी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.या बदल्यात महाराष्ट्राला यापेक्षाही मोठा प्रकल्प देऊ अशी जादुई चॉकलेटही आता हवेत हात फिरवून जनतेमध्ये भिरकावली जाणार आहेत.शिवाजी महाराजांनी  प्रजेचे कल्याण म्हणून महाराष्ट्र समृध्द करण्यासाठी सुरतेहून  खजीना आणला. हे सुमार बुध्दीचे समाजप्रतारक नेते मात्र स्वत:ची सत्ता आणि राजसिंहासनं टिकविण्यासाठी एकामागून एक प्रकल्प आणि कार्यालये दुसऱ्या राज्याला आपल्या मतलबासाठी खुशाल देऊन टाकत आहेत.जसे विकणारे विकत आहेत ,तसेच त्यांचे वारसे हे मेहरबाण्यांवर जगणारे नेते चालवित आहेत.आघाडी सरकारमुळे हा प्रकल्प गेला, तो गेला, असं हे किती दिवस लोकांना सांगत राहणार आहेत? त्या खोटं बोलण्याला आणि जनतेला फसवण्याबध्दल  मी हे काय करतो आहे असं थोडं तरी वैषम्य माणूस म्हणून वाटलं पाहिजे...!
              टाटा एअरबसचा प्रकल्प  हा नागपूरात प्रस्तावित होता.तो आघाडी सरकारने पाठपूरावा न केल्यामुळे गेला अशी आवई भाजपची मंडळी उठवत आहेत.त्या सुपर पावरच्या मेहरबानीनेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथराव शिंदे विराजमान झाले.त्यामुळे केंद्राच्या आदेशापुढे मान तुकविण्यापलिकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपुढे दुसरा कोणता इलाज नाही.हेच वेदांतच्या बाबतितही घडले आहे.म्हणून काय या राजकिय नेत्यांच्या महत्वाकांक्षांना खतपाणी घालत राहून त्यांची सत्तास्थाने अबाधित ठेवण्याचा ठेका महाराष्ट्राने घेतलेला आहे? जनतेच्या जीवनमानांच्या प्रश्नांसह  विकासाला बगल देऊन त्यांची किंमत जनतेने का चुकती करावी?असे एका पाठोपाठ प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरीत होत राहिल्यास महाराष्ट्रात काय उरणार आहे,यांचा विचार भाजपच्या विषारी प्रेमपाशात अडकलेल्या अंधभक्तांनी सर्वात अगोदर केला पाहिजे. देशातल्या मालमत्तांची विकटाक करीत आणि नवे येणारे प्रकल्प गुजरातला पळवून स्वत:चा प्रदेश समृध्द करणारे  पंतप्रधान आणि त्यांचे  केन्द्रसरकार  या देशाचे तारणहार सरकार आहे की फक्त गुजरातची चिंता वाहण्यासाठी सक्रिय आहेत.... हे प्रश्न जनतेतून विचारल्या गेले पाहिजेत.कारण आपण निवडून दिलेले अनेक लोकप्रतिनिधी  फक्त कुटूंबियांना पापांच्या मायेचं वैभव मिळवून देण्यासाठी, स्वत: आणि मुलाबाळांना परत उमेदवाऱ्या मिळवण्यासाठी, आपले वाढीव भत्ते,सोई सवलती पदरात पाडून घेण्यासाठी फक्त वेडे होतात.त्यापलिकडे जनतेचे प्रश्न आणि राज्याचा विकास ह्या बाबी त्यांनी गौण ठरविलेल्या आहेत. ती मतदारांच्याच छाताडावर नाचणारी स्वतःच्या स्वार्थासाठी सक्रिय असलेली नावापूरती माणसं आहेत.फक्त मतांच्या भिक्षेसाठी धर्माचे ढोल बडविणाऱ्या  त्या अमानवीय अपप्रवृत्तीच आहेत.हे जनेतेने वेळीच समजून घेतलं नाही तर उद्भवणारा वेदनादायी काळ प्रत्यक्ष परमेश्वरही टाळू शकणार नाही.त्याची चुणूक ही सुरूवात आहे,आणि आता टाटा एअरबस प्रकल्पही जाणे हा दिवाळीतला गोड धक्का आहे.यावर कोणती बायपास करावी लागणार हे समजून घेतलं पाहिजे.त्यानुसार वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या खजीण्यावर मौजमजा करून आपल्यालाही न विचारता उलट बेमालूमपणे विश्वासघाताचे धक्के देणारे हे घरभेदी आहेत हे समजलं पाहिजे.हे कोणी धर्मरक्षक, हिंदुत्वरक्षक नव्हे तर अकर्माने धर्माला बुडवून विकासाची नौकाही सागरात बुडविणारे विनाशी खलाशी आहेत.तेव्हा सावधान होणे आणि पुढचे प्रावधान ठेवणे हा आपला खरा गीताधर्म समाजाने अंगीकारावा.अन्यथा या अधर्माच्या संकटातून निर्माण होणारे वेदनादायी समाजसंकट आपल्याला टाळता येणार नाही....हे वास्तव सत्त्य आहे.चिंतन करून लक्षात घेण्यासारखे आणि ईतरांना सांगून जागृतीचे पर्व निर्माण करू शकणारे आहे.....!
संजय एम. देशमुख,
ज्येष्ठ पत्रकार मोबा.९८८१३०४५४६ 

    Post Views:  339


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व