कोरोनाची तिसरी लाट आली? मुंबईत 216 दिवसानंतर सर्वाधिक रुग्ण


राज्यात केसेस वाढल्या, ओमिक्रॉनचा धोका वाढला?
 संजय देशमुख  29 Dec 2021, 11:31 AM
   

मुंबई : महाराष्ट्र आणि राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची आणि ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढू लागलीय. मुंबईत गेल्या चोवीस तासात 1377 रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील ही 216 दिवसानंतरची सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. मुंबईत 26 मे रोजी 1352 रुग्णांची नोंद झाली होती. दुसरीकडे महाराष्ट्रातील रुग्णसंख्येनं 2 हजारंचा टप्पा ओलांडला आहे. तब्बल 75 दिवसानंतर रुग्णसंख्येनं 2172 रुग्णसंख्येची नोंद झाली. वाढती रुग्णसंख्या ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत 7 महिन्यानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 1377 रुग्णांची नोंद झालीय. ही रुग्णसंख्या गेल्या सात महिन्यांमधील सर्वाधिक असल्याचं सांगितलं जातंय. मुंबईत 26 मे म्हणजेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या काळात 1352 रुग्णांची नोंद झाली होती. काल नोंद झालेली रुग्णसंख्या ही त्यापेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रात 75 दिवसानंतरची सर्वाधिक रुग्ण वाढ

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळू हळू कमी होऊ लागली होती. राज्य सरकारनं अनेक गोष्टीवरील निर्बंध शिथील केले होते. नागरिकांकडून कोविड सुसुंगत वर्तन होत नसल्याचं अनेकदा दिसून आलं होतं. गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या वाढू लागली होती. मंगळवारी राज्यात 2172 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 22 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनासोबत ओमिक्रॉनचं संकट

देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 653 वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात 167, दिल्ली 165, केरळ 57 आणि गुजरातमध्ये 54 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील 91 बाधित बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत नोंदवली गेलीय. मुंबई 84, पिंपरी चिंचवड 19, पुणे जिल्हा 17, पुणे महापालिका 7, ठाणे महापालिका 7 , सातारा 5, उस्मानाबाद 5 आणि पनवेल महापालिका क्षेत्रात 5 रुग्णांची नोंद झालीय. तर, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर, बुलडाणा, लातूर, अकोला, अहमदनगर, वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पालघर, भिवंडीमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झालीय.

राज्यातील नव्या रुग्णांपैकी 61 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतून

मंगळवारी राज्यात 2172 कोरोनाबाधितांची नोंद झालीय. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातून झाली आहे. मुंबईत 1377 रुग्णांची नोंद झालीय. राज्याच्या रुग्णसंख्येचा विचार केला असता 61 टक्के रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत.

    Post Views:  218


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व