मुंडगावकर ज्वेलर्सची कोट्यवधीची जमीन, सोने-चांदी जप्त


शासनाकडे पाठविला लिलावाचा प्रस्ताव
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  16 Mar 2022, 8:17 PM
   

अकोला: शहरातील गुंतवणुकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणाऱ्या मुंडगावकर ज्वेलर्स संचालकांची जमीन, सोने-चांदी आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. गुंतवणुकदारांना त्यांची रक्कम परत देता यावी म्हणून जप्त मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
शहरातील बहुचर्चित मुंडगावर ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात आतापर्यंत एकूण ४५२ तक्रारी झाल्या असून तक्रारकर्त्‍या गुंतवणुकदारांची १६ कोटीपेक्षा अधिक रकमेने फसवणूक झाली आहे. तक्रारीचा ओघ सुरूच असून, फसवणुकीची रक्कम २० कोटीच्या पार जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय निनावी गुंतवणुकदारांच्या रक्कमेवरही या प्रकरणातील पोलिसांच्या तपसात लक्ष राहणार आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात कारवाई करीत आरोपी संचालक व त्यांच्या नातेवाईकांकडून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची जमीन, सोने-चांदी जप्त केली आहे. यापूर्वी दीड किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त करण्यात आली होती. आता पुन्हा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व मालमत्ता सील करून जप्तीची कारवाई पूर्ण झाल्याने तिचा लिलाव उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर करून गुंतवणुकदारांची रक्कम परत करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे.
जप्त करण्यात आलेली एकूण संपत्ती
मुंडगावकर ज्वेलर्सचे संचालक व त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये जमीन, सोने व चांदीचा समावेश आहे.
- अमोल, उदय, विजय मुंडगावकर यांची प्रत्येकी चार एक शेत जमीन
- राजू ठाकूर यांची बार्शीटाकळी येथील १८ एकर शेत जमीन
- मुंडगावर ज्वेलर्स संचालकांच्या मालकीचे शेगाव येथील ४०७ खुले भुखंड
- सात किलो चांदी
- दोन किलो ८०० ग्रॅम सोने
- यापूर्वी जप्त केलेलेले दीड किलो सोन्याचे दागिणे
- ३७ किलो चांदीचे दागिणे
-- आरोपीची कारागृहात रवानगी
मुंडगावकर ज्वेलर्स संचालकांकडून गुंतवणुकदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी सर्व आरोपी अटकेत असून त्यांची पोलिस कोठडी ता. १६ मार्च रोजी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

    Post Views:  188


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व