युट्यूबवर पाहून चोरट्याने ज्वेलर्सच्या दुकानातून लुटले तब्बल 10 कोटींचे सोने


 संजय देशमुख  22 Dec 2021, 11:53 AM
   

तामिळनाडू : युट्यूब पाहून चोरीचा प्लान करुन तरुणाने दागिन्यांच्या दुकानातून तब्बल 10 कोटी रुपयांचे 15 किलो सोने लुटल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील वेल्लोर येथे घडली आहे. पोलिसही या घटनेने चक्रावून गेले आहेत. पाच दिवस कसून शोध घेतल्यानंतर दुकान लुटणाऱ्या चोरट्याला पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. तिखाराम असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

15 डिसेंबर रोजी लुटले होते ज्वेलर्सचे दुकान

वेल्लोर येथील अलुक्कास ज्वेलर्सच्या दुकानात 15 डिसेंबर रोजी चोरी झाली होती. चोरट्याने 15 किलो सोन्याचे दागिने लांबवले होते. या दागिन्यांची बाजारातील किंमत 10 कोटी रुपये आहे. चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. यावेळी पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिंहाचा मुखवटा घातलेला एक माणूस स्प्रे पेंटचा वापर करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग थांबवण्याचा आणि नंतर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले.

पाच दिवसाच्या अथक प्रयत्नाने चोरटा जेरबंद

या चोरीच्या घटनेबाबत पोलिसांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. चोरी होत असताना कोणीही गजर का वाजवू शकले नाही? परिसरातून कोणीही संशयित आढळले नाही. पोलिसांनी सुमारे 200 सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची छाननी केली. पोलिसांच्या पाच दिवसांच्या अथक परिश्रमाचे अखेर सोमवारी त्यांना यश आले. पोलिसांनी कुचिपलायम गावातील 22 वर्षीय तिखाराम या आरोपीला पोलिसांनी अटक केले.

युट्यूबवर व्हिडिओ पाहून केला चोरीचा प्लान

पोलिसांनी तिखारामकडे चौकशी केली असता, यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्याने चोरीची योजना आखल्याचे पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. तिखारामने ज्वेलरी दुकानाच्या भिंतीला कोणताही आवाज होऊ नये म्हणून छिद्र पाडण्यासाठी 10 दिवसांचा अवधी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्याची आणि सीसीटीव्ही ब्लॉक करण्याची ट्रिकही यूट्यूबवर शिकून घेतली. तिखारामने सोने वितळण्यासाठी मशीन घेतली होती आणि ते ओदुकाथूर स्मशानभूमीत लपवून ठेवले होते. मात्र, झटपट श्रीमंतीच्या प्रयत्नात असणारा तिखाराम शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून 10 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 457 आणि 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    Post Views:  170


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व