ऑनलाईन खरेदीने चाकावरील संसारांनाआर्थिक संकटांचा फटका..!


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  06 Nov 2023, 5:24 PM
   

अकोला : आपला माणूस पोटभर जेवला पाहिजे.. आयुष्यातील अधिक वर्षं जगला पाहिजे!सामुहिक सहजीवनात समस्यामुक्त माणसांचा निरोगी समाज अबाधित राहिला पाहिजे! हे माणुसकीचे चिंतनशील विचार समाजातील अनेक माणसांना जीवनात तारू शकतात .अनेकांच्या आनंदी जीवनातून उच्चतम आनंदाच्या नंदनवनाला बहरून टाकू शकतात.मी जेवलो,तृप्त झालो.परंतू माझ्या शेजाऱ्यांच्या घरात चुल पेटली की नाही यावर लक्ष ठेवणारी आणि कृतिशील वाटचाल करणारी माणसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत माणसं आहेत. अशी माणसं समाजात निर्माण झाली पाहिजेत.तीच मानवी समाजाची खरीखूरी दिवाळी राहणार आहे!

         आज तंत्रज्ञान हे जसे वरदान आहे, तेवढाच तो श्रमिकांच्या मानगुटीवर बसून त्यांचे जीवन संपवणारा महाभयंकर अभिशाप ठरत आहे.हातात आलेले मोबाईल आणि घरबसल्या काहीही मिळवून देण्याच्या क्षमता ठेवणारे ते तंत्रज्ञान कसे,कुठे आणि किती प्रमाणात हाताळावे याची काहीही परिसीमा न बाळगणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. त्यांचेकडून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल गोरगरीबांना संपविण्याचा विघातक वापर सुरू झाला आहे.माझी दिवाळी ऐश्वर्यसंपन्न पध्दतीने दिव्यांच्या रोषणाईने साजरी होत आहे.त्याचवेळी आपल्याशिवाय कुणा कुणाच्या घरात अंधार आहे हे पाहण्याची उपरती समाजातील किती लोकांना आहे हा एक चिंतनशील प्रश्न आहे.
        कपड्या लत्त्यांसून तर खाण्या पिण्याच्या पदार्थांपर्यतच्या खरेदीमध्ये अतिरेकी स्वारस्य बाळगणारांनी सामान्य व्यावसायिकांना संपविण्याचा जणू  विडाच उचललेला आहे.त्यामुळे छोट्या छोट्या श्रमिक व्यालसायिकांना ऑनलाईन खरेदीच्या भुताटकीने आज जबरदस्त फटका दिला आहे. माती तुडवून चाकावर बनविल्या जाणाऱ्या दिवाळीतील पणत्यांनाही त्याची झळ बसलेली आहे.त्यामुळे दिवाळीच्या पणत्या विकून दिवाळी साजरी करू म्हणणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील मातीकाम करणाऱ्या श्रमिकांच्या दिवाळीत अंधाराचे विष कालवल्या गेले आहे.बाजारात फेरफटका मारला असता पणत्या विकणारे श्रमिकांसाठी व्यावसायिक एखादं दुसरं गिऱ्हाईक येणं हीच मोठी गोष्ट आहे.नाही तर माणसांच्या गर्दीत दिवाळी स्वप्नातील आशेच्या नजरा लावून उन्हातान्हात तळ ठोकून बसलेले आहेत.शुण्यात नजरा हरवून येणाऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत!
           तंत्रज्ञानाने माणसाला आळशी करून त्यांच्या मानसिक संवेदनांवर विजय मिळविलेला आहे.आपण जर प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मागायला लागलो तर व्यवसायांवर उपजिविका असणारे आपले समाज बांधव जगणार तरी कसे?ह्या भावना, हे मानवतेचे उदात्त विचार आज प्रत्येक माणसामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.दारिद्र्याच्या अंधारल्या भिंतीआड माणसांनी माणसांना संपविण्याचा काळ निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे.म्हणून ऑनलाइनच्या नांदी लागून आपला पैसा धनाढ्याच्या घशात घालण्यापेक्षा ती अनुचित खरेदी थांबवून आम्ही आमच्या माणसांना,शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना जगविण्याचा संकल्प केला पाहिजे!ही मानवतेची उदात्त भावना हिच खरी दिवाळी, आपल्या सहकार्याने,मानवतावादी नैतिक पाठिंब्याने ईतरांच्या जीवनात आनंदाच्या संवेदनांचा खरा प्रकाश  निर्माण झाला पाहिजे.तिच मानवी समूहाची खरी दिवाळी ठरणार आहे.......चला तर आजपासून ऑनलाईन खरेदीला देऊ फाटा....संकल्पाचा फिरवू काटा....आमच्याच लोकांचे जीवन  उजळवू प्रकाशाने, त्यांनाच दाखवू विकासाच्या खऱ्या वाटा...!

एक आर्त आवाहन....
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ
एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना, अकोला (महाराष्ट्र)
संकल्पना ...सौ.दिपाली बाहेकर...
वार्तांकन आढावा....संजय एम.देशमुख संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष

    Post Views:  332


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख