नवीन मोंढ्यात रेशनचा तांदूळ वाहतूक करणारा १२ चाकी ट्रक पोलिसांच्या ताब्यात!


LCB आणि कोतवाली पोलिसांची संयुक्त कारवाई; वाहनासह तांदळाचा साठा जप्त.
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 Nov 2026, 8:32 AM
   

परभणी : युसूफ पठाण
परभणी शहरातील नवीन मोंढा परिसरात शासकीय सार्वजनिक वितरण प्रणालीचा (PDS) तांदूळ बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत MH 04 GR 4906 क्रमांकाचा १२ चाकी ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून, ट्रकमधील तांदळाचा साठाही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय रेशनिंगचा तांदूळ नियमबाह्य पद्धतीने वाहतूक केला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा आणि कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवीन मोंढा परिसरात कारवाई करत संबंधित ट्रक ताब्यात घेतला.
दरम्यान, वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाचा साठा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. सदर तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांसाठी वितरित होणारा आहे काय, तसेच त्याची वाहतूक कोणत्या उद्देशाने केली जात होती, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी संबंधित ट्रक ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात जमा केला आहे. या घटनेची पोलीस स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी तालुका पुरवठा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना माहिती देण्यात आल्याचे समजते.
रेशनच्या तांदळाची वाहतूक नेमकी कोणासाठी? काळाबाजाराचे जाळे उघड होणार का?
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना, अशा धान्याची नियमबाह्य वाहतूक होत असल्याचा संशय निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणात संबंधित धान्याचा मूळ पुरवठादार कोण, वाहतुकीची परवानगी होती का, धान्य कुठून आणले आणि कुठे नेले जात होते, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, या ट्रकमधील तांदळाचा मूळ स्रोत, संबंधित वाहतूकदार आणि संभाव्य लाभार्थी यांची चौकशी केल्यास या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे समोर येऊ शकतात. या प्रकरणाच्या तपासातून रेशन धान्याच्या कथित गैरव्यवहारामागील संपूर्ण साखळी उघड होणार का, याकडे आता परभणीकरांचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व