मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : प्रभात किड्स राज्यात प्रथम
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा -टप्पा २ या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रभात किड्स स्कूल, अकोला ने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवित 51लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.
हे अभियान ५ ऑगस्ट 2024 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधी दरम्यान राबविण्यात आले. या उपक्रमात शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाआहे. दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण यांची अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारित 150 गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते. यानुसार शाळांचे प्रत्येक स्तरावर तज्ञ समितीकडून काटेकोरपणे मूल्यमापन होऊन या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी या दोन गटांमधून खाजगी शाळा अंतर्गत प्रभात किड्स स्कूल, अकोला या शाळेने गुणवत्ता पूर्ण आणि नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारला निकाल घोषित करून शाळेचे अभिनंदनही केले आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या प्रभात किड्स स्कूलला ५१ लाखाचे पारितोषिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे शासकीय समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्य शासन, शिक्षण विभाग, अकोला, प्रभात चा समर्पित सर्व कर्मचारी वृंद, सहकार्य करणारा संपूर्ण पालक वर्ग, प्रभातचे सर्व गुणवंत विद्यार्थी, हितचिंतक आणि सर्व स्नेही यांचे संचालक डॉ. गजानन नारे, सौ .वंदना नारे यांनी सर्वांचे शतशः आभार व्यक्त केले आहे. प्रभातने राबवलेले गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम, अभ्यासपूर्वक उपक्रम, क्रीडा स्पर्धेतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहभागात मानाचे पुरस्कार यामुळेच प्रभात किड्स स्कूलने हा सर्वोच्च सन्मान प्राप्त केला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा मान विदर्भातील प्रभात किड्स स्कूलने मिळविल्याबद्दल संपूर्ण राज्यात प्रभातच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याला राज्य मान्यतेची मोहोर लागली आहे याचा सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
Post Views: 317