मराठा समाजाने वधु वर परिचय मेळाव्या बाबत मानसिकता बदलण्याची गरज - अशोकराव अमानकर


5 जानेवारीच्या मेळाव्यात बहुसंख्येने सहभागी व्हा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Jan 2025, 12:05 PM
   

अकोला..... आज महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाने वधू वर परिचय मेळाव्याबाबत आपली मानसिकता बदलवून अशा मेळाव्यांमध्ये आपल्या उपवर मुला मुलींसह बहुसंख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन पाटील समाज अकोला चे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी केले आहे. इतर समाजाच्या मेळाव्यांमध्ये शेकडो मुले मुली सहभागी होतात. परंतु संख्येच्या मानाने मराठा समाजाचे मुले मुली अशा मेळाव्यांमध्ये सहभागी होत नाहीत व आपला परिचय देत नाहीत. ही चिंतनीय बाब बनली आहे.
                 या परिस्थितीबाबत आवाहन करताना अमानकर म्हणतात की, जनजागृतीचे एक पाऊल म्हणून व नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मराठा समाजातील युवक युवतींनी एक उत्सव समजून अशा मेळाव्यांमध्ये मोठ्या संख्येत सहभागी झाले पाहिजे. आपला मुलगा किंवा मुलगी मेळाव्यातील स्टेजवर उभा करण्यामध्ये आज काही लोक कमीपणा मानतात. ज्या मुला मुलींची लग्न जुळत नाहीत असेच या मेळाव्यात सहभागी होतात असा एक प्रचंड मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे. हा अतिशय चुकीचा गैरसमज मनातून काढून टाकून पालकांनी व उपवर मुला मुलींनी अशा मेळाव्यांमध्ये सहभाग घेतला पाहिजे व त्यात कोणत्याही प्रकारचा कमीपणा नाही याची जाणीव ठेवली पाहिजे.
आज सर्वच समाजाचे असे मेळावे धुमधडाक्यात घेतले जातात. त्यात श्रीमंतांपासून तर गरिबांपर्यंत सर्व स्तरातील लोक सहभागी होतात. शेकडोंच्या संख्येत सर्वच प्रकारचे व उच्चविद्याविभूषित मुले मुली अशा मेळाव्यांमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात. त्यांचे विवाह सुद्धा जुळतात. यानिमित्ताने मोठ्या ओळखी निर्माण होऊन त्यांची नाती तयार होतात. मग मराठा समाजानेच आपल्या मनात असा चुकीचा समज व न्यूनगंड का बाळगावा हा अभ्यासाचा व चिंतेचा विषय बनला आहे.
             पाटील समाज अकोला मागील दहा वर्षापासून या क्षेत्रात काम करीत आहे. त्यांना समाजातील लोकांनी व उपवर मुला मुलींनी मेळाव्यात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन अमानकर यांनी केले आहे. या कार्यासाठी अमानकर यांचे नेतृत्वाखाली पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे, उपाध्यक्ष विनायकराव शेळके, सुरेश गाडे पाटील, कार्याध्यक्ष सुनील जानोरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार, सहसचिव विजय बोरकर, कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर दिलीप मानकर, वासुदेवराव कडू, अविनाश पाटील, प्रकाश चतरकर, राजरत्न मानकर, अविनाश नाकट, संदीप महल्ले, निलेश पवित्रकार, दिलीपराव काकोडे, शरद पांडे, विक्रम जानोरकर व इतरही सदस्य परिश्रम घेत आहेत
                येत्या 5 जानेवारी 2025 रोजी पाटील समाज अकोला तर्फे स्थानिक जानोरकर मंगल कार्यालय रिंग रोड कौलखेड अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या वधू वर परिचय मेळाव्यात समाजातील बंधू-भगिनींनी आपल्या उपवर मुला मुलींसह मोठ्या संख्येत सहभागी व्हावे व मेळावा यशस्वी करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी  5  पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सहभागी होताना पालकांनी आपल्या उपवर मुला मुलींचे परिचय पत्र दोन प्रतीत व दोन पासपोर्ट कलर फोटोसह जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    Post Views:  98


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व