दिनांक १४ व १५ नोव्हेंबर रोजी अमरावतीत रंगणार सर्जनशील शब्दवेलचे सहावे साहित्य संमेलन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Oct 2026, 9:10 AM
   

पनवेल : मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांना एकत्र आणत नवोदित आणि ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये वैचारिक संवाद घडवून आणण्यासाठी दिनांक १४ व १५ नोव्हेंबर २०२६ रोजी शब्दवेलचे सहावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण सेंटर, अमरावती व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल  यांचे संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांच्या सहयोगाने अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय या साहित्य संमेलनात साहित्य, विचार, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा जागर घडणार असून राज्यभरातील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींचे लक्ष या संमेलनाकडे लागले आहे.
     या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची नियोजित निवड करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक ,साहित्य अकादमी नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.प्रमोद मुनघाटे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे मुख्य संरक्षक श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा यशवंतराव चव्हाण सेंटर अमरावती  चे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख असून संमेलनाचे प्रमुख अतिथी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपराव इंगोले , यशंतराव चव्हाण सेंटर अमरावतीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश अंधारे, श्री प्रदीप देशमुख व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी प्राचार्य डॉ महेंद्र मेटे यांनी स्वीकारली असून डॉ. राजेश मिरगे हे कार्याध्यक्ष म्हणून संमेलनाच्या आयोजनाची धुरा सांभाळणार आहेत.
सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाने अल्पावधीतच साहित्य क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून विविध साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साहित्यिकांना एकत्र आणण्याचे काम सातत्याने केले आहे. संस्थेच्या वतीने यापूर्वी ठाणे, पनवेल, पुणे आणि सातारा येथे साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनांच्या माध्यमातून साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळण्याबरोबरच विविध साहित्यप्रवाहांवर चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण घडून आली आहे.
संस्थेच्या यापूर्वीच्या साहित्य संमेलनांना साहित्यविश्वातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. प्रतिभा सराफ, अरुण म्हात्रे, आसावरी काकडे, पुष्पराज गावंडे ॲड धनराज वंजारी आणि ए. के. शेख यांसारख्या साहित्यिकांनी विविध संमेलनांमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे सर्जनशील शब्दवेलच्या साहित्य संमेलनांची साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
      अमरावती येथे होणारे आगामी संमेलनही साहित्यिकांसाठी वैचारिक आणि साहित्यिक मेजवानी ठरणार आहे. दोन दिवसांच्या या संमेलनात विविध साहित्यिक उपक्रम, विचारविनिमय आणि साहित्याशी निगडित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिकांच्या अनुभवांचे मार्गदर्शन, नवोदित साहित्यिकांच्या लेखनाला प्रोत्साहन तसेच विविध साहित्यप्रकारांवर चिंतन-मनन करण्याची संधी या संमेलनातून उपलब्ध होणार आहे.आजच्या बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीमुळे तसेच विविध साहित्यिक उपक्रमांमुळे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी समृद्ध अनुभव देणारे ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
     साहित्यिकांनी, कवी-लेखकांनी, वाचकांनी आणि साहित्यप्रेमींनी या सहाव्या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेलचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी केले आहे.

    Post Views:  8


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व