गाडगेबाबा यांचा १५० वा जयंती महोत्सव कामोठे येथे भव्य उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Apr 2026, 8:20 AM
   

कामोठे : विदर्भ वैभव मंदिर,मुंबई,विदर्भ समाज संघ तसेच संत गाडगेबाबा बहुउद्देशीय विचार मंच कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांचा १५० वा जयंती महोत्सव कामोठे येथे भव्य  उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रविवार दिनांक २९ मार्च रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर सकाळी खांदेश्वर रेल्वे स्थानक ते कामोठे परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
संत दर्शन कार्यक्रमांतर्गत गोरक्षक, जीवदया प्रेमी संत दिलीप बाबा यांच्या उपस्थितीने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तसेच सागर नामदेव तोडकर यांनी गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधले.
संध्याकाळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध प्रबोधनकार इंजिनियर पवन महाराज दवंडे यांच्या कीर्तनाचे होते. त्यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कीर्तनामधून अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, रक्तदान यांसारख्या सामाजिक विषयांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार बाळाराम पाटील यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विदर्भ वैभव मंदिरचे अध्यक्ष अशोकरावजी बारब्दे, विदर्भ समाज संघाचे सरचिटणीस गजाननरावजी  नागे, विदर्भ समाज संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार, नगरसेवक विकास घरत, हॅपी सिंग, नगरसेविका कुसुमताई रविंद्र म्हात्रे, बाईजा बबन बारगंजे, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, एकनाथजी ठाकूर, प्रशांतजी देशमुख, अमोल ठाकूर आदी मान्यवरांचा समावेश होता.
या भव्य जयंती महोत्सवातून संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता, सेवा आणि समाजप्रबोधनाच्या विचारांचा प्रभावी प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्तमराव लोणारकर यांनी केले. आभार  प्रदर्शन संस्थेचे सर्वेसर्वा मा. श्री अनिलकुमार गयाबाई मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री एकनाथजी ठाकूर, प्रशांतजी देशमुख आणि अमोल ठाकूर यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रार्थनेने करण्यात आली. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी  महाप्रसादाचा लाभ घेतला.

    Post Views:  2


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व