हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्व. धाकलेश्वर मक्काजी करनाडे यांच्या कार्याची शासकीय पडताळणी करा; चौक नामकरण व पूर्णाकृती पुतळ्याची मागणी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Sep 2026, 9:23 AM
   

जालना -हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार स्व. धाकलेश्वर मक्काजी करनाडे यांच्या कार्याची शासकीय अभिलेखांच्या आधारे पडताळणी करून त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची अधिकृत नोंद करावी, तसेच त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी चौक नामकरण व पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल सत्यनारायण करनाडे यांनी केली आहे.
        यासंदर्भात राहुल करनाडे यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनासोबत उपलब्ध जुन्या वृत्तपत्रीय कात्रणाची प्रत तसेच महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून २८ डिसेंबर १९८७ रोजी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कामगिरीच्या गौरवार्थ देण्यात आलेल्या सन्मानपत्राची झेरॉक्स प्रत सादर करण्यात आली.उपलब्ध वृत्तपत्रीय कात्रणात स्व. धाकलेश्वर मक्काजी करनाडे यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भूमिगत राहून कार्य केल्याचा उल्लेख असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सन्मानपत्राची मूळ प्रत उपलब्ध नसल्याने संबंधित शासकीय नस्ती, अभिलेख व नोंदी शोधून त्याची अधिकृत पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
      पडताळणीनंतर उपलब्ध अधिकृत नोंदीनुसार त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची अभिलेखीय नोंद करावी, संबंधित कागदपत्रांचे जतन व डिजिटल अभिलेखीकरण करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.तसेच जालना-बदनापूर मार्गावरील योग्य व सुरक्षित चौकास “स्वातंत्र्यसैनिक स्व. धाकलेश्वर मक्काजी करनाडे चौक” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करावा आणि शासनाच्या नियमांनुसार आवश्यक मंजुरी घेऊन त्या ठिकाणी स्व. करनाडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.ही मागणी कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या ऐतिहासिक योगदानाचे दस्तऐवजीकरण, शासकीय अभिलेखांचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी इतिहास सुरक्षित ठेवण्याच्या सार्वजनिक हिताच्या उद्देशाने करण्यात आल्याचे राहुल सत्यनारायण करनाडे यांनी सांगितले.

    Post Views:  4


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व