रशियाचा युक्रेनवर ताबा, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष बंकरमध्ये
रशियासोबत चर्चेसाठी तयार
कीव : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियन सैन्य राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहे. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सैन्य बंकरमध्ये आश्रय घेतल्याचे पुढे आले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर ताबा मिळवला असून, युक्रेनमधील अणू ऊर्जा प्रकल्पही ताब्यात घेतला आहे. रशियाने युक्रेनला चर्चेची ऑफर दिली आहे. पण त्याआधी युक्रेनने त्यांची सैन्य कारवाई थांबवावी, अशी अट ठेवली आहे. तर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
युक्रेनच्या सैन्याने शरणागती पत्करल्यास रशिया चर्चा करण्यास तयार असल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटले आहे. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना लावरोव यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. आम्ही वाटाघाटी करण्यासाठी कोणत्याही क्षणी तयार आहोत. युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे खाली ठेवल्यास चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे लावरोव म्हणाले आहेत.
युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाचा ताबा
युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे. रशियन आक्रमणामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. यातच रशियाने युक्रेनधील चेर्नोबिल अणु ऊर्जा प्रकल्पावर आधीच कब्जा केला आहे. दरम्यान, कीवपासून साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावर वायव्येकडे असलेल्या इव्हान्कीव्ह येथे नदीवरील एक पूल शुक्रवारी सकाळच्या सुमारास नष्ट झाला आहे.
यूक्रेन राष्ट्रपतींचे मदतीसाठी आवाहन
पश्चिमी नेत्यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी त्यांचे लोकशाही पद्धतीने आलेले सरकार पाडू शकेल, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवू शकेल असे रशियाचे हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केले आहे.
भारतीयांसाठी दोन विमाने
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय लोकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने एअर इंडियाची 2 विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्ही विमाने शनिवारी पहाटे दोन वाजता उड्डाण करण्यास सुरुवात करतील. ही विमाने रोमानियाची राजधानी बुखारेस्ट मार्गे लोकांना एअरलिफ्ट करणार आहेत.
Post Views: 266