महाराष्ट्रात समृद्धी अन् अकोल्यात पाऊस पडावा यासाठी श्री राजराजेश्वराला शिवसेनेचे साकडे; माजी आमदार डॉ. राजन साळवींच्या हस्ते महापूजा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Sep 2026, 8:36 AM
अकोला : महाराष्ट्रात आणि विशेषतः अकोला जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी अन् नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. पाणीटंचाईमुळे पिके वाळू लागली असून बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराजा चरणी साकडे घालून राज्यात अन् अकोल्यात जोरदार पाऊस पडावा, यासाठी शिवसेना अकोला जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते आज श्री राजराजेश्वराची महापूजा आणि महाआरती करण्यात आली.
अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर महाराजांची ही मोठी ख्याती आहे की, जेव्हा जेव्हा जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते, तेव्हा महाराजांना साकडे घातल्यास हमखास पाऊस पडतो. याच श्रद्धेने आज शिवसेनेच्या वतीने हे विशेष धार्मिक अनुष्ठान पार पडले.
"महाराष्ट्रात सध्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. अकोला जिल्ह्यातही तीच भीषण परिस्थिती आहे. राजराजेश्वर महाराज हे अकोल्याचे श्रद्धास्थान असून त्यांच्याकडे साकडे घातल्यास पाऊस येतोच, हा आमचा गाढ विश्वास आहे. राजराजेश्वराने प्रसन्न होऊन संपूर्ण महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाडावा आणि बळीराजाला सुखी करावे, याच प्रार्थनेसाठी आम्ही येथे आलो आहोत." डॉ. राजन साळवी (माजी आमदार व शिवसेना संपर्कप्रमुख) या पूजेप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, विदर्भ प्रवक्ते प्राध्यापक प्रकाश डवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल, शिवसेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते राजराजेश्वराचा अभिषेक, पूजा आणि आरती संपन्न झाल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
Post Views: 23