होय...माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे होणार नाही; राज ठाकरेंनी दिली कबुली!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  19 Sep 2022, 1:06 PM
   

नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी आणि सोमवारी नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरेंनी नागपुरातील मनसेची सर्व महत्वाची पदं बरखास्त करत असल्याची घोषणा केली. घटस्थापनेला नवं पदाधिकारी आणि कार्यकारिणी जाहीर करेन, असं राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं. मनसेची पद बरखास्त करण्याची वेळ आली म्हणजे तुमचं विदर्भाकडे दुर्लक्ष झालं असं वाटत नाही का? असं राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी उघडपणे याची कबुली देखील दिली. 

होय, माझ्याकडून आणि आमच्या सहकाऱ्यांकडून दुर्लक्ष झालं. पण यापुढे असं होणार नाही, असं एका वाक्यात राज ठाकरेंनी विदर्भाकडे झालेल्या दुर्लक्षाची कबुली दिली. नागपुरातील मनसेची पदं बरखास्त करण्याचं कारण देखील यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आलं. नागपुरात काही चुकीची कामं सुरू होती. पक्षाला १६ वर्ष झाली पण त्यामानानं अपेक्षित पक्ष वाढीचं काम नागपुरात झालेलं नाही. त्यामुळे पदं बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच नव्या चेहऱ्यांना संधी देणं देखील महत्वाचं आहे. पक्षात काही तरुण फायरब्रँड कार्यकर्ते आहेत त्यांना पुढे आणलं पाहिजे असं मला वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले. 

नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नागपुरातील मनसेच्या सर्व महत्वाची पदं बरखास्त करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आमचे जे काही सेल्स आहेत. महत्वाची पदं आहेत ती बरखास्त करत आहे. घटस्थापनेच्या दिवशी नवी कार्यकारणी जाहीर करेन. आता २७ सप्टेंबरला पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक आहे. त्यानंतर २८ तारखेला आमचे काही नेते नागपूरात येतील. नवरात्रीनंतर मी कोल्हापूरमार्गे कोकण दौरा करणार आहे. त्यानंतर दोन दिवसांसाठी मी पुन्हा नागपुरात पक्ष बांधणीसाठी येणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

    Post Views:  180


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व