प्रजा फाउंडेशनच्या ‘टॉप मोस्ट ५’मध्ये आमदार सुनिल प्रभु यांचा सलग १२ वर्षे गौरव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Aug 2026, 1:49 PM
मुंबई - प्रजा फाउंडेशनच्या लोकप्रतिनिधींच्या कामकाजाच्या मूल्यमापनात शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभु यांनी सलग १२ वर्षे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘टॉप मोस्ट ५’ आमदारांमध्ये स्थान मिळवले आहे. मतदारसंघातील विकासकामे, विधानसभा सभागृहातील प्रभावी कामगिरी आणि सभागृहातील शंभर टक्के उपस्थिती यामुळे आमदार सुनिल प्रभु यांच्या कार्याची सातत्याने दखल घेण्यात आली आहे.
प्रजा फाउंडेशन गेल्या १२ वर्षांपासून विधिमंडळ तसेच महानगरपालिका सदस्यांच्या कामकाजाचे विविध निकषांवर मूल्यमापन करून त्याचा अहवाल प्रसिद्ध करते. या अहवालामुळे नागरिकांना त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सभागृहात आणि मतदारसंघात नेमके कोणते काम करतात, याची माहिती मिळते. तसेच लोकप्रतिनिधींनाही आपल्या कामातील त्रुटी ओळखून कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची संधी मिळते.
आमदार सुनिल प्रभु यांनी गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत विधानसभा सभागृहात सातत्यपूर्ण उपस्थिती राखत विविध लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडली. आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांचा पाठपुरावा करण्याबरोबरच विकासकामांमध्येही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
सभागृहातील प्रभावी कामगिरी, शंभर टक्के उपस्थिती आणि मतदारसंघातील सातत्यपूर्ण लोकहिताची कामे यामुळे आमदार सुनिल प्रभु यांचे नाव सलग १२ वर्षे प्रजा फाउंडेशनच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच आमदारांमध्ये राहिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मतदारसंघातून समाधान व्यक्त होत आहे.
Post Views: 4