सेवानिवृत्त ज्येष्ठांच्या समस्या मार्गी लावणे हे मोठे पुण्य कर्म -आ. रणधीर सावरकर
भाजप सेल तर्फे विविध समस्यांबाबत शासन व अधिकाऱ्यांना निवेदन सादर
अकोला....... सेवानिवृत्त जेष्ठ कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देणे हे मोठे पुण्य कर्म आहे. करिता नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या भाजप सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सेल ने हे कार्य अधिक आस्था पूर्वक करावे असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे. या सेलच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आ. सावरकर यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात या सेलच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी सदर सेलचे संयोजक सुनील जानोरकर, सहसंयोजक प्रदीप खाडे, सरचिटणीस राजेंद्र नेरकर, कोषाध्यक्ष अशोक मांगुळकर उपस्थित होते.
आपली तीस-पस्तीस वर्षाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच काही समस्या असतात. या समस्या सोडविण्यासाठी त्यांना त्रास सहन करून संबंधित कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेऊन या सेलची स्थापना केली आहे. हा सेल स्थापन होताच आज पर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीतच सुमारे 67 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यात या सेलला यश आले आहे. सेलच्या या कामगिरीबद्दल अनेक ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या सेल मार्फत सेवानिवृत्ती अथवा मृत्यूच्या दिनांकावर शिल्लक असलेल्या अर्जित रजेची समतुल्य रक्कम एका महिन्याच्या आत मंजूर करावी. या महत्त्वपूर्ण मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना सादर करण्यात आले आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या मागण्या जि. प. प्रशासनाकडे सेल मार्फत सादर करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गौरी गणपती सणापूर्वी महागाई भत्ता वाढ व थकबाकी अदा करण्यात यावी अशीही मागणी वजा विनंती मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांच्या काही समस्या अथवा मागण्या असल्यास त्यांनी योग्य कागदपत्रांसह आपले निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मा. पालकमंत्री यांचे कार्यालयातील भाजप सेल कडे कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------------------
Post Views: 1