मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट-भाजपा आणि शिवसेनेत वाद वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेनेतील अनेक नेते शिंदे गटातील बंडखोर आमदारांविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
शिवसेना फोडण्यामागे भाजपाचाच हात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अकोला येथे शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी थेट मोदींना लक्ष्य केलं.
मुंबईच्या महापौर बंगल्यावर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत आडवाणी बाळासाहेबांना म्हणाले की, बाळासाहेबजी, एक गंभीर समस्या आहे. आम्ही ठरवलं आहे की, मोदींना हटवायचं आहे. त्यावर काय म्हणता? मोदींना हटवणार? मोदी गेले, तर गुजरात गेला, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं, अशी आठवण अरविंद सावंत यांनी करुन दिली. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन आडवाणींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना फोन करून सांगितलं की, मोदींना हटवू नका, असं अरविंद सावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात म्हणाले. आज मोदी देशाचे पंतप्रधान दिसत आहेत. मात्र बाळासाहेबांनी वाचवलं नसतं ना, तर मोदी आज कुठल्या गल्लीत पडलेत, हे कुणाला कळलंही नसतं, अशी टीका त्यांनी केली. तसेच बाळासाहेबांच्या या उपकाराची फेड तुम्ही अशी करता आहात?, असा सवाल अरविंद सावंत यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. दसरा मेळाव्याकरता बीकेसीतील एक मैदान शिंदे गटानं आरक्षित केलं आहे. मात्र अद्याप ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी कोणतही मैदान मिळालेलं नाही, त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Post Views: 153
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay