स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांवर एकतर्फी निर्णय लादू नका – अन्यथा रस्त्यावर उतरू” – निलेश देव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Jun 2026, 8:20 AM
अकोला - शहरातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत संदेश पाठविण्यात येत आहेत. मात्र केवळ संदेश पाठवून नागरिकांना विश्वासात न घेता, पुरेशी माहिती न देता व प्रक्रिया स्पष्ट न करता मीटर बदलण्याची घाई सुरू असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे गटनेता व नगरसेवक निलेश देव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, स्मार्ट तंत्रज्ञानाला विरोध नाही; पण नागरिकांच्या हक्कांवर अतिक्रमण करून, पारदर्शकता न ठेवता आणि उत्तरदायित्व टाळून कोणताही निर्णय अकोलेकरांवर लादला जाणार नाही.
आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत –
मीटर बदलण्याचा आधार काय?
उद्याचे बिल कसे येणार?
वेळेनुसार दर (ToD) लागू होणार का?
मीटर चुकीचे आढळल्यास जबाबदार कोण?
बिल वाढल्यास दाद कुठे मागायची?
महावितरणने या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्याऐवजी केवळ “सहकार्य करा” असे सांगणे योग्य नाही.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खालील मागण्या करण्यात येत आहेत :
* प्रत्येक ग्राहकाला मीटर बदलण्याचे कारण लेखी स्वरूपात द्यावे.
* मीटर बसविण्यापूर्वी अधिकृत कर्मचारी व कंत्राटदारांची माहिती जाहीर करावी.
* जुना व नवीन मीटर रीडिंगची लेखी नोंद ग्राहकाला द्यावी.
* स्मार्ट मीटरमुळे बिलिंगमध्ये काय बदल होणार याबाबत सार्वजनिक जनजागृती करावी.
* नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा.
* कोणत्याही ग्राहकाकडून थेट किंवा अप्रत्यक्ष आर्थिक आकारणी होणार नाही याची हमी द्यावी.
महावितरण प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात येत आहे की, नागरिकांना विश्वासात न घेता, दबाव टाकून किंवा अपुरी माहिती देऊन मीटर बदलण्याचे काम सुरू राहिल्यास वंचित बहुजन आघाडी जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारेल.
वीज ही सुविधा आहे, उपकार नाहीत.
अकोलेकरांना माहिती, पारदर्शकता आणि न्याय मिळालाच पाहिजे.
– निलेश देव, गटनेता, वंचित बहुजन आघाडी
नगरसेवक, अकोला महानगरपालिका
Post Views: 4