AI च्या काळात सुध्दा कधीही कालबाह्य न होणारी मूलभूत मानवी कौशल्ये म्हणजेच शॉर्टहॅण्ड़ आणि कॉम्प्यूटर टायपिंगचे प्रशिक्षण - प्राचार्य नितीन भोळे, अकोला.


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Mar 2026, 9:11 AM
   

बघा आपणास विदीतच आहे की, आज जग वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI), ऑटोमेशन, डिजिटल तंत्रज्ञान आणि इंटरनेट यामुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठे परिवर्तन झाले आहेत. अनेकांना तर असे देखिल वाटते की AI मुळे पारंपरिक कौशल्यांचे महत्त्व कमी होईल. परंतु प्रत्यक्षात पाहिले तर काही मूलभूत कौशल्ये अशी आहेत की जी कोणत्याही युगात अप्रासंगिक होत नाहीत. त्यामध्ये शॉर्टहॅण्ड आणि कॉम्प्युटर टायपिंग या दोन कौशल्यांचा विशेष समावेश होतो, असे मला वाटते. साध्या सोप्या भाषेत आपण शॉर्टहॅण्ड म्हणजे वेगाने ऐकलेले शब्द अचूकपणे लिहून ठेवण्याची कला, तर कॉम्प्युटर टायपिंग म्हणजे संगणकावर जलद आणि अचूक पद्धतीने माहिती नोंदविण्याचे कौशल्य, असे म्हटल्यास वावगे नाही कारण ही दोन्ही कौशल्ये आजही प्रशासन, न्यायव्यवस्था, उद्योग, मीडिया आणि शासकीय कार्यालयांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जातात. AI च्या युगातसुद्धा या कौशल्यांचे महत्त्व कमी झालेले नसून उलट अधिक स्पष्टपणे जाणवते, नाही कां ?
आजच्या युगात माहितीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बैठका, चर्चासत्रे, न्यायालयीन प्रक्रिया, सरकारी निर्णय, पत्रकार परिषद अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माहितीची देवाणघेवाण होते. अशा वेळी वेगाने आणि अचूकपणे माहिती नोंदविण्याची क्षमता अत्यंत आवश्यक असते. शॉर्टहॅण्ड हे असे कौशल्य आहे ज्यामुळे बोललेले शब्द अक्षरशः टिपता येतात. अनेकदा बैठकीत किंवा न्यायालयात घेतलेले निर्णय भविष्यात संदर्भासाठी महत्त्वाचे ठरतात. अशा वेळी जर शब्दशः नोंद असेल तर त्याची विश्वासार्हता अधिक असते. AI आधारित व्हॉइस रेकॉर्डिंग साधने असली तरी त्यात चुका होण्याची शक्यता असते. भाषेतील उच्चार, गोंधळ, पार्श्वभूमीतील आवाज किंवा तांत्रिक अडचणी यामुळे रेकॉर्डिंग अचूक नोंद देऊ शकत नाही. परंतु केवळ प्रशिक्षित स्टेनोग्राफर मात्र वक्त्याचे बोलणे अचूकपणे टिपू शकतो. त्यामुळे मानवी कौशल्याची विश्वासार्हता अजूनही सर्वोच्च आहे हे सिध्द होते. आज देखील स्टेनोग्राफर्स आणि कॉम्प्यूटर ऑपरेटर्स यांना शासकीय सेवांमधील कायमची मागणी असून भारतामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, न्यायालये आणि विविध आयोगांमध्ये परिपूर्ण स्टेनोग्राफर आणि टायपिस्ट पदांची मागणी कायम आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC), राज्य लोकसेवा आयोग (MPSC), उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, मंत्रालये, सार्वजनिक उपक्रम या सर्वच ठिकाणी शॉर्टहॅण्ड आणि टायपिंगचे कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते आणि या पदांसाठी परीक्षा देताना उमेदवाराला मुख्यत्वे दोन गोष्टी आवश्यक असतात – १. शॉर्टहॅण्ड स्पीड २. कॉम्प्युटर टायपिंग स्पीड. आज निदर्शनास येत आहे की, अनेक विद्यार्थी पदवी घेतल्यानंतरही नोकरीच्या शोधात असतात. परंतु ज्यांच्याकडे शॉर्टहॅण्ड आणि टायपिंगचे प्रशिक्षण असते त्यांना सरकारी सेवेत प्रवेश करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होते. त्यामुळे ही कौशल्ये आजही करिअर घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, नाहीत कां ?
AI हे साधन (Tool) आहे, पर्याय (Replacement) नाही—ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. 
उदाहरणार्थ, एखाद्या बैठकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग AI करू शकतो; परंतु त्याचे अधिकृत मिनिट्स तयार करणे, संक्षिप्त अहवाल बनवणे, आवश्यक मुद्दे अधोरेखित करणे आणि योग्य स्वरूप देणे त्याच प्रमाणे बैठकीत एखाद्या वक्त्याने केलेली टिप्पणी, व्यंग, संदर्भ किंवा महत्त्वाचा मुद्दा ओळखून त्याची योग्य नोंद करणे हे काम प्रशिक्षित व्यक्तीच अधिक चांगल्या प्रकारे करु शकतो… AI ला ते शक्य़ नाही.
शॉर्टहॅण्ड जाणणारा विद्यार्थी AI चा योग्य वापर करून अधिक कार्यक्षम बनू शकतो. म्हणजेच Human + AI हा समन्वयच भविष्यातील यशाचा पाया आहे असे म्हणता येईल. शॉर्टहॅण्ड आणि कॉम्प्यूटर टायपिंग प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नियमितता, एकाग्रता, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास विकसित होतो. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कौशल्ये अत्यंत उपयुक्त ठरतात. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी अल्प खर्चात रोजगारक्षम कौशल्य मिळवून देणारे हे प्रभावी प्रशिक्षण आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या कौशल्यांच्या आधारे शासकीय सेवेत प्रवेश मिळवला आहे. शॉर्टहॅण्ड आणि टायपिंग शिकल्याने विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक गुण विकसित होतात. एकाग्रता वाढते, श्रवण कौशल्य सुधारते, वेळेचे व्यवस्थापन शिकता येते, कामाची शिस्त लागते, आत्मविश्वास वाढतो हे कौशल्य शिकताना विद्यार्थ्याला नियमित सराव करावा लागतो. त्यामुळे त्याच्यामध्ये शिस्तबद्ध जीवनशैली निर्माण होते. हीच शिस्त पुढे करिअरमध्ये मोठे यश मिळविण्यास मदत करते.
आज डिजीटल युगात आपण पाहतो की, जवळजवळ सर्व कामे कॉम्प्यूटरवरच केली जातात. पण बघा, ई-मेल, अहवाल, प्रेझेंटेशन, डेटा एंट्री, कार्यालयीन पत्रव्यवहार, न्यायालयीन दस्तऐवज – या सर्व कामांसाठी जलद टायपिंग आवश्यक असते. फक्त़ ज्याला टायपिंग चांगले येते तो कमी वेळात जास्त काम करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा टायपिंग स्पिड ३० शब्द प्रति मिनिट असेल आणि दुसऱ्याचा ६० शब्द प्रति मिनिट असेल, तर दुसरी व्यक्ती दुप्पट काम करू शकते. त्यामुळे संस्थांना अशा कर्मचाऱ्यांची गरज असते ज्यांचा टायपिंग स्पिड चांगला असतो, नाही कां ? AI साधने मजकूर तयार करण्यात मदत करू शकतात, पण तो मजकूर संपादित करणे, व्यवस्थित सादर करणे आणि व्यवस्थापित करणे यासाठी देखिल कॉम्प्यूटर टायपिंग कौशल्य आवश्यकच असते. पत्रकार परिषद, मुलाखती, सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये वक्त्यांचे बोलणे वेगाने टिपणे आवश्यक असते. अनेक अनुभवी पत्रकार अजूनही शॉर्टहॅण्डचा वापर करतात. कारण रेकॉर्डिंगवर पूर्णपणे अवलंबून राहणे कधी कधी धोकादायक ठरू शकते. शॉर्टहॅण्ड वापरुन पत्रकार महत्त्वाचे मुद्दे त्वरित नोंदवू शकतो आणि त्यावर आधारित बातमी तयार करू शकतो. त्यामुळे या क्षेत्रातही या कौशल्याचे अनन्य साधारण असे महत्त्व कायम आहेच, नाही कां ?
न्यायालयात चालणारी प्रत्येक कार्यवाही अधिकृतरीत्या नोंदवली जाते. न्यायाधीशांचे आदेश, वकिलांचे युक्तिवाद, साक्षीदारांचे स्टेटमेंट्स – या सर्व गोष्टींची अचूक नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक असते. येथे तर स्टेनोग्राफरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. न्यायालयीन प्रक्रियेत एका शब्दाचीही चूक गंभीर परिणाम घडवू शकते, नाही कां ? अशा वेळी प्रशिक्षित स्टेनोग्राफरच विश्वासार्ह पर्याय ठरतो. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध भरती प्रक्रियांमध्ये शॉर्टहॅण्ड व टायपिंग पात्रता आजही अनिवार्य आहे. Staff Selection Commission, Maharashtra Public Service Commission तसेच मंत्रालयीन विभाग, जिल्हा न्यायालये, सार्वजनिक उपक्रम येथे स्टेनो टायपिस्ट, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, हायर ग्रेड स्टेनोग्राफर, पर्सनल असिस्टंट या पदांसाठी शॉर्टहॅण्ड व कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा घेतली जाते. AI कितीही विकसित झाले तरी अधिकृत नोंदी, गोपनीय कागदपत्रे आणि कायदेशीर मजकूर तयार करण्यासाठी जबाबदार व प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यकच आहे असे वाटते. वर नमूद केल्याप्रमाणे सरकारी भरती प्रक्रियांमध्ये टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची चाचणी घेतली जाते. जे विद्यार्थी आधीपासून या कौशल्यांमध्ये पारंगत असतात केवळ त्यांना स्पर्धेत मोठा फायदा होतो. आज लाखो विद्यार्थी पदवीधर होतात, पण त्यांच्याकडे विशेष कौशल्य नसते. अशा परिस्थितीत शॉर्टहॅण्ड आणि टायपिंग ही रोजगाराभिमुख कौशल्ये ठरतात हे ठामपणे सांगावेसे वाटते. 
शास्त्रशुध्द आणि परिपूर्ण अशा शॉर्टहॅण्ड़ आणि कॉम्प्यूटर टायपिंग या कौशल्यांमुळे केवळ नोकरीच नव्हे तर स्वयंरोजगाराच्या संधी देखील निर्माण होतात. डेटा एंट्री काम, ट्रान्सक्रिप्शन सेवा, टायपिंग सेंटर, ऑनलाइन फ्रीलान्स काम, कार्यालयीन दस्तऐवज तयार करणे इत्यादि त्या सोबतच आपल्याला माहित आहे की, आजच्या डिजिटल युगात अनेक कंपन्या बाहेरून टायपिंग आणि ट्रान्सक्रिप्शन काम देतात. त्यामुळे प्रशिक्षित व्यक्तींना घरबसल्या देखील काम मिळू शकते.
शॉर्टहॅण्ड आणि टायपिंग शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ही कौशल्ये केवळ वाचनाने येत नाहीत. त्यासाठी दररोज सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही संस्थेत प्रशिक्षण न घेता केवळ या विषयांचे परिपूर्ण ज्ञान अवगत असणाऱ्या अनुभवी शिक्षकांकडून प्रशिक्षण घेतल्यास प्रगती जलद होते. कारण शॉर्टहॅण्ड़ आणि कॉम्प्यूटर टायपिंगचा फक्त वेग वाढवणे पुरेसे नाही; चुका कमी करणे देखील आवश्यक आहे. नियमित उपस्थिती आणि मेहनत यामुळेच यश मिळते. AI च्या वापराने अनेक कामे करणे सुलभ आहे, परंतु मानवी संदर्भ, भावना आणि परिस्थितीचे आकलन अजूनही माणसाइतके अचूकपणे करणे AI साठी शक्य नाही असे वाटते. शॉर्टहॅण्ड शिकताना विद्यार्थ्याची एकाग्रता, ऐकण्याची क्षमता आणि भाषेवरील प्रभुत्व वाढते. त्यामुळे तो केवळ शब्द लिहीत नाही, तर संपूर्ण संदर्भ समजून घेतो. ही मानवी बुद्धिमत्ता AI ला पूर्णपणे बदलू शकत नाही, AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाने जग बदलले असले तरी काही मूलभूत मानवी कौशल्ये अशी आहेत की जी कधीही कालबाह्य होत नाहीत. शॉर्टहॅण्ड आणि कॉम्प्युटर टायपिंग ही त्यापैकीच दोन महत्त्वाची कौशल्ये आहेत. ही कौशल्ये केवळ नोकरी मिळवण्यासाठीच उपयुक्त नाहीत, तर व्यक्तीची कार्यक्षमता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढवतात या बाबत शंका नाही. सरकारी सेवा, न्यायव्यवस्था, मीडिया, उद्योग आणि डिजिटल क्षेत्रात या कौशल्यांची मागणी आजही कायम आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच अशा पारंपरिक पण अत्यंत प्रभावी कौशल्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. AI च्या युगात यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच मानवी कौशल्यांची जोड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मेहनत, सातत्य आणि योग्य प्रशिक्षण आहे, त्यांच्यासाठी शॉर्टहॅण्ड आणि कॉम्प्युटर टायपिंग ही कौशल्ये उज्ज्वल करिअरचा भक्कम पाया ठरू शकतात, नाही कां ?
आजच्या काळात अनेकांना त्वरित यश हवे असते; परंतु शॉर्टहॅण्ड आणि टायपिंग या कौशल्यांसाठी सातत्यपूर्ण सराव आणि संयम आवश्यक असतो. हीच सातत्याची सवय भविष्यातील मोठ्या यशासाठी पायाभूत ठरते. AI साधने बदलत राहतील, नवीन तंत्रज्ञान येत राहील; परंतु वेग, अचूकता आणि जबाबदारी ही मूलभूत मूल्ये कायम राहतील. आणि म्हणूनच सांगावेसे वाटते की, AI युगात शॉर्टहॅण्ड आणि कॉम्प्युटर टायपिंगचे महत्त्व कमी झालेले नाही, तर अधिक व्यापक झाले आहे. अधिकृतता, विश्वासार्हता, गोपनीयता आणि अचूकता या सर्व बाबींमध्ये ही कौशल्ये अनन्यसाधारण आहेत. तंत्रज्ञानाच्या लाटेत वाहून न जाता, तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून स्वतःची कौशल्ये अधिक सक्षम करणे हीच आजच्या तरुणांची खरी गरज आहे. शॉर्टहॅण्ड आणि कॉम्प्युटर टायपिंग ही केवळ रोजगाराची साधने नाहीत, तर शिस्तबद्ध आणि यशस्वी जीवनाची मजबूत पायाभरणी आहेत, बघा विचार करुन पटतं कां ?
प्राचार्य नितीन सुरेखा शरद भोळे,
शॉर्टहॅण्ड़ आणि कॉम्प्यूटर टायपिंग विषय तज्ञ,
स्कॉलर शॉर्टहॅण्ड़ ॲण्ड़ कॉम्प्यूटर टायपिंग इन्स्टिटयूट,
अकोला – ४४४ ००१ मोबाईल ९४२३८ ४४६६६

    Post Views:  26


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व