शिवाजी महाराजांनी धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात आणले - डॉ. शिवरत्न शेटे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Mar 2026, 9:08 AM
   

अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सकल हिंदू समाज, मलकापूर वस्ती, अकोला यांच्या वतीने शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी कला महाविद्यालय मैदान, मलकापूर, अकोला येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले.
या संमेलनाची सुरुवात क्रांती चौक, मलकापूर येथील श्री गजानन महाराज संस्थान येथून निघालेल्या भव्य कलश यात्रेने झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात महिला भजनी मंडळे, नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संमेलन स्थळापर्यंत वातावरण भक्तिमय केले.
व्यासपीठावर स्वागताध्यक्ष श्री. मनोहर आप्पा गवळी यांनी प्रमुख वक्ते प्रा. विवेकजी बिडवई व डॉ. शिवरत्न शेटे यांचे स्वागत केले, तर महिला वक्त्या सौ. गौरीताई थोरात यांचे स्वागत सौ. सोनल बढे यांनी केले. यावेळी गायत्री बालिकाश्रमाच्या विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात शौर्य शर्मा आणि खुशी शर्मा यांच्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर गायत्री बालिकाश्रमाच्या विद्यार्थीनींनी शिवचरित्रावर आधारित नाटिका सादर केली.
प्राप्ती ठाकरे हिने एकच राजा इथे जन्मला हे गीत सादर केले, तर अन्वी साबळे आणि गार्गी बिडवे यांनी बहारदार गीते सादर केली. स्वराज थोडगे याने मुखोद्गत असलेले श्रीविष्णोरष्टाविंशतिनामस्तोत्र सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच श्रावणी राजवैद्य आणि संस्कृती सुधीर बंड यांनी प्रभावी पोवाडा सादर केला. यानंतर गायत्री बालिकाश्रमाच्या विद्यार्थीनींनी तायक्वांडो व लाठी-काठीची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख वक्ते प्रा. विवेकजी बिडवई यांनी पंच परिवर्तन – एक जीवनशैली या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत सामाजिक समरसता, आत्मनिर्भरता, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संतुलन आणि कुटुंब प्रबोधन या विषयांचे महत्त्व स्पष्ट केले. महिला वक्त्या सौ. गौरीताई थोरात यांनी आपल्या मनोगतात घराची जबाबदारी ही केवळ महिलांची नसून पती-पत्नी दोघांची समान जबाबदारी आहे, असे सांगत पुरुषांनीही घरकामात सहकार्य करावे, असे आवाहन केले.
डॉ. शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास प्रभावीपणे उलगडला. शिवाजी महाराजांनी धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात आणल्याची उदाहरणे देत त्यांनी हिंदू धर्मरक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच, सीमेवर लढणारे सैनिक कोणत्याही एका धर्मासाठी नव्हे तर देशासाठी लढतात, त्यामुळे सीमेवर बलिदान देणाऱ्यांना हुतात्मा म्हणून संबोधले पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
या भव्य हिंदू संमेलनाचे संचालन प्राचार्य नितीन भोळे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप भारत मातेची आरती करून करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व बंधू-भगिनींना आयोजकांच्या वतीने राम खिचडीचे वितरण करण्यात आले.

    Post Views:  31


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व