दिवाळी हा भारतातील सर्वांत मोठा व सर्वांत आनंदी सण मानला जातो. आनंदाचा, प्रकाशाचा, चैतन्याचा, उत्साहाचा व उल्हासाचा हा सण स्वच्छता व प्रसन्नता पसरवतो. जिकडे तिकडे दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिशबाजी, विविध गोड व खा-या पदार्थांची मेजवानी, नवीन कपडे, नवीन गाड्या, नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी व ओसंडून वाहणारा बाजार, दिवालीच्या सुट्या, आप्तांच्या भेटीगाठी व आवडत्या ठिकाणांचे पर्यटन हे सर्व दिवाळी आपल्यासोबत आणते. दिवाली सर्वांच्या जीवनात आनंद पेरते हे जरी संपूर्ण खरे समजले जात असले तरी ते अर्धसत्य आहे. दिवाळी
श्रीमंत, नेते, उच्चवर्गीय ( आर्थिकदृष्ट्या), अधिकारी, नोकरदार व व्यापारी यांच्यासाठी निश्चितच आनंदाची व लाभाची आहे पण शेतकरी, शेतमजूर, कामगार, हमाल, गरीब व भिकारी यांच्यासाठी ती तेवढी आकर्षक व हवीहवीशी वाटत नाही.
अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील उभं पीक डोळ्यांसमोर पाण्यात सडून खराब झालं. त्याचं हिरव्या सोन्याचं स्वप्न पाण्यात वाहून गेलं. निसर्गानं तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. घरचा, बॅंकेकडून व इतरांकडून घेतलेला कर्जरुपी पैसा पाण्यात गेला. उत्पादन व त्यामुळे होणारा लाभ तर सोडाच दुबार तिबार पेरणी करूनही हाती काही न लागल्यामुळे तो कर्जबाजारी झालेला आहे. घरात पैसा नाही, शेतात पीक नाही, घरचा खर्च, मुला बाळांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपणावर होणारा खर्च व पै पाहुण्यांचा खर्च, मरणधरण व कौटुंबिक कार्यक्रम यासाठी लागणा-या खर्चाची तजवीज कशी करावी याच विवंचनेने व काळजीने तो त्रस्त झालेला आहे. आर्थिक तसेच मानसिक व भावनिक खच्चीकरणामुळे निराशेचे विचार त्याच्या मनात येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे शेतक-यांसाठी दिवाळी पाहिजे तेवढा आनंद आणू शकली नाही हे सत्य आहे. सरकारी धोरणे व नियम यांच्यासोबतच निसर्गाचा मार झेलत तो कसाबसा तग धरून आहे. नाही म्हणायला त्याला सरकार मदत करते पण ऊंट के मुंह में जीरा या हिंदीतल्या म्हणीप्रमाणे ती मदत तुटपुंजी ठरते. अशा परिस्थतीमध्ये त्याने आपल्या मुलांना नवीन कपडे कसे खरेदी करावे, घरात विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ कसे बनवावे, आनंदी व उत्साही कसे राहावे यावर चिंतन व मंथन होणे गरजेचे आहे. जगाला पोसणारा स्वतःचं पोषण कसं करायचं हा प्रश्न पडत असेल तर बाकीच्यांनी दिवाळी कशी साजरी करायची? शेतकऱ्याबरोबरच ज्याचे हातावर पोट आहे किंवा जो बेरोजगार आहे त्याने ही दिवाळी आपणास चिडवत आहे असे म्हटले तर चुकले कुठे? बाकीची मंडळी वारेमाप खर्च करत असताना त्याने फक्त जाहिराती पाहूनच पोट भरावं का? अनाथाश्रमातील बालके, वॄद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांचे काय? जरी अशा वेळेस सामाजिक संस्था, मंडळे, काही दानशूर व संवेदनशील व्यक्ती वंचितांना काही मदत करतात. वंचितांच्या प्रकाशवाटा पसरवण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे. महागाई वाढलेली आहे. म्हणून गरिबांचे जिणे कठीण झाले आहे. मोठमोठ्या इमारतींवर रोषणाई असताना बाजूच्या झोपडीत त्याचा थोडा तरी उजेड गेला पाहिजे. आपल्या अन्नातला एक घास त्यांच्या मुखात गेल्यावर जो आनंद तुम्ही पाहाल तो हजारो रुपये देऊनही मिळणार नाही. दुखी, उदास चेहऱ्यावर आनंद आणायचा असेल तर दिवाळी
त्यांच्यासोबत साजरी करायला काय हरकत आहे? आपल्या बाल्कनीत आकाश कंदील आहे. त्यांच्या अंगणात आनंद कंदील व चैतन्याचा सडा आपण निश्चितच टाकू शकतो. वाऱ्यासोबत जसा गंध पसरतो तसाच आनंदाचा गंध आपल्या कृतीद्वारे पसरवला तर पृथ्वीवरील थोडा अंधार दूर केल्याचे समाधान तुम्हाला नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. थोडे लोकांची थोडीशी निराशा दूर केली तर आशा वाढीस लागन्यास उशीर होणार नाही. स्वतःपासून सुरुवात करू या. मग तुम्ही म्हणण्यास पात्र ठराल हॅपी दिवाळी...
____________________________________________प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे, अकोला
____________________________________________
Post Views: 302