नाईक – खेतान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीराचा समारोप
शामकी माता शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ उमरी, ता. मानोरा,जि. वाशिम द्वारा संचालित सुधाकरराव नाईक कला व उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यालय,अकोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना पथकांच्या वतीने संस्थेचे संस्थापक सचिव मा. बी.पी.पवार सर आणि प्र. प्राचार्य डॉ. भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन दत्तक ग्राम येवता, ता.जि. अकोला येथील धम्मभूमी या स्थळी दि. ११ ते १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भास्कर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि येवता गावाच्या सरपंच सौ. वंदनाताई सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दि. १८/०२/२०२५ रोजी या विशेष शिबीराची सांगता झाली. सर्वप्रथम सकाळी गावातून स्वच्छता अभियान, शिव्यामुक्त समाज, बेटी बचावो, बेटी पढावो यासारख्या विषयावर विविध घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्र. प्राचार्य डॉ. भास्कर पाटील यांनी श्रमसंस्कार, चारित्र्य, समाजसेवा, राष्ट्र्निष्ठा, नियोजन व व्यवस्थापनांचे धडे देणारे हे रासेयो शिबीर सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. या शिबिराच्या समारोपीय सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सरपंच सौ. वंदनाताई सिरसाट यांनी शिबिरार्थीनी दत्तक ग्राम येवता येथील स्मशानभूमीत केलेल्या वृक्षारोपणाची, तेथील स्वच्छता अभियानाची आणि गावात श्रमदानातून निर्माण केलेल्या शोषखड्डयाबाबत विद्यार्थ्यांचे विशेष असे कौतुक करून, नेहमीच अशी ग्रामसेवा आणि देशसेवा विद्यार्थ्यांच्या हातून घडावी अशी इच्छा व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नेमीचंद चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून या विशेष शिबीराच्या अंतर्गत दत्तक ग्राम येवता येथे राबविल्या गेलेल्या सर्व उपक्रमाची माहिती याप्रसंगी दिली. सदर शिबीरात विविध उद्बोधन वर्ग घेण्यात आले. रासेयो आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे brand ambassaidor रोहन बुंदेले यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला यांच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. अभिषेक हांडे, डॉ. माधुरी येळमे आणि डॉ. सुरज सिंह जाधव यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी १७ शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या आरोग्य शिबीरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताच्या नऊ तपासण्या करण्यात आल्यात, त्यांचा गावातील शेकडो लाभार्थ्यांनी लाभ घेतला. आधुनिक शेती, तंत्रज्ञान व माती परीक्षण या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ. श्याम जाधव आणि डॉ. दारासिंग राठोड यांनी विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली. Youth for my bharat, youth for digital literacy या विषयावर रेल्वे चाईल्ड लाईनचे समन्वयक प्रा. पद्माकर सदांशिव यांनी तर बेटी बचावो बेटी पढावो या विषयावर डॉ. वैशाली मुने यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिरांमध्ये दररोज सकाळी प्रार्थना, योगा आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, गायन, वक्तृत्व, पथनाट्य, एकपात्री प्रयोग अशा विविध उपक्रमात रासेयो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या समारोपीय कार्यक्रमात ओम केनेकर, आनंदगोविंद सपकाळ, अनिकेत डोंगरे, अर्जुन कुंभरे, गौरव चव्हाण, आदित्य जांगीड, प्रज्ज्वल उगले, राज जाधव, शीतल दांडगे, शिवानी माने, रीना नहाटे, जीत कळमकर, निखील इंगोले, या शिबिरार्थीनी आपल्या सात दिवसीय निवासी शिबीरातील आठवणीना उजाळा देत, आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. या विशेष शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल मेश्राम, डॉ. नितीन देऊळकार, प्रा. दीपक वाघमारे, डॉ. अनंत राठोड, प्रा. योगेश चव्हाण, प्रा. संदीप कुऱ्हाडे, प्रा, विनोद इंगोले, डॉ. एकनाथ खेडकर, प्रा. संदेश गवारगुरू, प्रा. पद्माकर सदांशिव, प्रा. राहुल वाधवानी, प्रा. राधा मुरुमकार. प्रा. ज्योती वानखडे, प्रा, हर्षदा जाधव, प्रा. भारती चोखानी, प्रा.किरण शर्मा, प्रा. रश्मी मोटवानी, प्रा. कल्पना तरवाडे, धनराज ससाने, वासुदेव ढोरे, रेणुकाबाई राठोड, सुभाष इंगळे, दीपक वानखडे, उमेश राठोड, ऋषी वडे, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय जायले, धम्मा भाऊ गोपनारायण, सम्राट गोपनारायण यांनी प्रयत्न केले. या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम केनेकर यांनी तर आभार रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता तिहिले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गावातील निमंत्रित नागरिक उपस्थित होते.
Post Views: 114